Maharashtra News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण करणारे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून १४ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.
यासंदर्भात पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी १० फेब्रुवारी रोजी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे.
सर्वसामान्य मराठा समाज आज आरक्षणासाठी शांततेत मोर्चे काढून सरकारला आरक्षणाची मागणी करत आहे. सरकारला वेळ देऊन सुद्धा सरकार वेळ काढूपणा करत आहे. उद्या जर जरांगे पाटील यांच्या जीवाचे काही बरे, वाईट झाले तर, महाराष्ट्रात उद्रेक होईल याची सरकारने गांभीर्याने दाखल घ्यावी.
जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
त्याचाच भाग म्हणून नगर शहरासह संपूर्ण जिल्हा बंद पुकारण्यात येत असल्याचे गजेंद्र दांगट, मदन आढाव, राम जरांगे, विक्रांत दिघे, प्रमोद कोरडे, बलराज आठरे, संदीप जगताप, अनिकेत आवारे, अमोल लक्ष्मण हुंबे पाटील, स्वप्नील दगडे, विलास तळेकर, शशिकांत भांबरे, गोरक दळवी यांनी म्हटले आहे.