Live Bus Location Tracking | महाराष्ट्रातील लाखो प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीने प्रवाशांच्या सोयीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लवकरच लालपरीचा प्रवास आणखी सोयीचा आणि वेळबद्ध होणार आहे. यासाठी महामंडळ एक नवी सेवा सुरू करणार आहे.
प्रताप सरनाईक यांची ग्वाही-
ग्रामीण भागात अजूनही एसटी हेच प्रमुख सार्वजनिक वाहतूक साधन आहे. विद्यार्थ्यांपासून वयोवृद्ध नागरिकांपर्यंत अनेकजण एसटीच्या प्रवासावर अवलंबून असतात. मात्र अनेकदा बस उशिरा येणे, नेमकी कुठे पोहोचली आहे याची माहिती न मिळणे अशा अडचणींमुळे प्रवाशांची गैरसोय होते. ही समस्या लक्षात घेता आता एसटी महामंडळाने प्रवाशांना बसचे लाईव्ह लोकेशन कळावे यासाठी मोबाईल अॅपद्वारे नवी सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती दिली असून, येत्या महिनाभरात ही सेवा सुरू केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. या सेवेअंतर्गत एसटी बस कुठे आहे, किती वेळात थांब्यावर येईल, याची माहिती थेट प्रवाशांच्या मोबाईलवर मिळणार आहे. यामुळे वेळ वाचणार असून प्रवास अधिक नियोजनबद्ध करता येणार आहे.
अॅपद्वारे कळणार लोकेशन-
मुंबई लोकलप्रमाणे एसटीसाठीही ही तंत्रज्ञान आधारित सुविधा उपलब्ध होणार आहे. अॅपद्वारे बसच्या लोकेशनची माहिती मिळाल्यास प्रवाशांना वेळेचा अंदाज येणार आहे. शाळकरी मुले, कर्मचारी, महिला आणि ग्रामीण भागातील नागरिक यांना याचा विशेष फायदा होणार आहे.
राज्यात एसटी महामंडळ विविध योजनांच्या माध्यमातून प्रवाशांना आकर्षित करत आहे. महिलांसाठी मोफत प्रवास, ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलत, विद्यार्थ्यांसाठी पास सुविधा अशा योजनांमुळे लालपरी पुन्हा लोकप्रिय ठरत आहे. आता त्यातच तंत्रज्ञानाची जोड दिल्याने सेवा आणखी प्रभावी होणार आहे.
ही सेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांच्या अडचणी कमी होतील, तसेच एसटीवरचा विश्वास अधिक बळावेल. राज्य सरकारचा हा निर्णय खऱ्या अर्थाने लालपरीला नव्या युगात घेऊन जाणारा ठरेल.