केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी १५ ऑगस्ट २०२५ पासून राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करणाऱ्या खासगी वाहनांसाठी ३,००० रुपयांत फास्टॅग आधारित वार्षिक टोल पास सुरू करण्याची घोषणा केली आहे. या योजनेद्वारे कार, जीप आणि व्हॅनसारख्या बिगर-व्यावसायिक वाहनांना एका वर्षात २०० टोल प्रवासांसाठी किंवा एक वर्षाच्या कालावधीसाठी, जे आधी पूर्ण होईल, टोल सुविधा मिळणार आहे. या पासमुळे प्रवास स्वस्त आणि जलद होईल, तसेच टोल नाक्यांवरील गर्दी आणि वाद कमी होण्यास मदत होईल.
वार्षिक टोल पासची वैशिष्ट्ये
हा वार्षिक टोल पास केवळ बिगर-व्यावसायिक खासगी वाहनांसाठी डिझाइन करण्यात आला आहे, ज्यात कार, जीप आणि व्हॅन यांचा समावेश आहे. हा पास राष्ट्रीय महामार्ग आणि राष्ट्रीय द्रुतगती मार्गांवरील टोल नाक्यांवर लागू असेल. पासची वैधता सक्रिय झाल्यापासून एक वर्ष किंवा २०० प्रवासांपर्यंत, जे आधी पूर्ण होईल, तेवढी असेल. पासची किंमत ३,००० रुपये असून, यामुळे प्रवाशांना सरासरी ७,००० रुपयांची बचत होईल, कारण एका टोल नाक्यावर सरासरी ५० रुपये खर्च येतो, ज्यामुळे २०० प्रवासांसाठी १०,००० रुपये खर्च येऊ शकतो.

पास खरेदी कुठे करायचा?
वार्षिक टोल पास खरेदी करण्यासाठी प्रवाशांना राजमार्ग यात्रा मोबाइल अॅप किंवा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) च्या अधिकृत वेबसाइटचा वापर करता येईल. पास सक्रिय करण्यासाठी फास्टॅग आणि संबंधित वाहनाची पात्रता तपासली जाईल. यानंतर वापरकर्त्याने ३,००० रुपये ऑनलाइन पेमेंट करावे लागेल. ज्या वाहनांकडे आधीपासून फास्टॅग आहे, त्यांना नवीन फास्टॅग घेण्याची आवश्यकता नाही; सध्याच्या फास्टॅगवरच हा पास सक्रिय होईल. पास सक्रिय झाल्यावर नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एसएमएसद्वारे सूचना मिळेल.
कुठे लागू असणार आहे पास?
हा वार्षिक पास फक्त राष्ट्रीय महामार्ग आणि राष्ट्रीय द्रुतगती मार्गांवरील टोल नाक्यांवर लागू असेल. राज्य महामार्ग, स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे चालवले जाणारे टोल नाके किंवा समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग यांसारख्या मार्गांवर हा पास वैध ठरणार नाही. उदाहरणार्थ, जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर (राष्ट्रीय महामार्ग) हा पास चालेल, परंतु नवीन मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर तो लागू होणार नाही. तसेच, हा पास केवळ नोंदणीकृत खासगी वाहनासाठीच वैध असेल आणि दुसऱ्या वाहनावर त्याचे हस्तांतरण करता येणार नाही. व्यावसायिक वाहनांवर वापरल्यास पास त्वरित निष्क्रिय केला जाईल.
टोल प्रवासांची मोजणी
टोल प्रवासांची मोजणी दोन प्रकारे होईल. पॉइंट-आधारित टोल नाक्यांवर एका टोल नाक्यावरून गेल्यास एक प्रवास मोजला जाईल, तर पुढे-मागे प्रवास (राउंड ट्रिप) केल्यास दोन प्रवास मोजले जातील. क्लोज्ड टोलिंग प्रणालीत एक प्रवेश आणि एक निर्गम (एंट्री-एक्झिट) याला एक प्रवास मानला जाईल. जर वर्षभरात २०० टोल प्रवास पूर्ण झाले, तर प्रवाशांना पुन्हा नवीन पास खरेदी करावा लागेल, ज्यामुळे वर्षभरासाठी किंवा आणखी २०० प्रवासांसाठी सुविधा मिळेल.
योजनेचे फायदे
या योजनेचा मुख्य उद्देश टोल नाक्यांवरील प्रतीक्षा वेळ कमी करणे, गर्दी टाळणे आणि टोल पेमेंट प्रक्रिया सुलभ करणे हा आहे. विशेषतः ६० किलोमीटरच्या परिघात राहणाऱ्या आणि नियमित प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना याचा मोठा फायदा होईल. यामुळे टोल नाक्यांवरील वाद कमी होतील आणि प्रवास अधिक सुरळीत होईल. तसेच, एकाच डिजिटल व्यवहाराद्वारे वर्षभराची टोल पेमेंट सुविधा मिळाल्याने वाहनचालकांना बारंबार रिचार्ज करण्याच्या त्रासापासून मुक्ती मिळेल.
७००० हजार रूपयांची बचत
नितीन गडकरी यांनी सांगितले की, या पासमुळे प्रवाशांना सरासरी १०,००० रुपये खर्च येणाऱ्या टोलच्या तुलनेत ७,००० रुपयांची बचत होईल. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीला दिल्ली ते वाराणसी असा प्रवास करायचा असेल, तर त्याला साधारण ३,००० रुपये टोल खर्च येऊ शकतो. वर्षात दोन-तीन वेळा असा प्रवास केल्यास ९,००० ते १०,००० रुपये खर्च होऊ शकतात. मात्र, ३,००० रुपयांच्या वार्षिक पासमुळे हा खर्च टाळता येईल. ही योजना विशेषतः वारंवार प्रवास करणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी फायदेशीर ठरेल.