माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आ. राजेश टोपे यांच्या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केला आहे. दगडफेक करत त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. जालन्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर ही दगडफेकीची घटना घडली आहे. या हल्ल्यात गाडीचे नुकसान झाले आहे.
नेमकं काय घडलं?
जालन्यात सध्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकांचा बिगुल वाजलेला आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजेश टोपे जिल्हा मध्यवर्ती बँकेत आलेले होते. त्यांची गाडी जिल्हा बँकेच्या इमारतीजवळ उभी केली होती. त्याचवेळी त्यांच्या गाडीच्या समोरील भागावर दगडफेक केली गेली. एक लाकडी दांडा आणि ऑइलची बाटली या ठिकाणी आढळून आली आहे. गाडीचा चालक गाडीतच होता.
पोलीस घटनास्थळी दाखल
मराठवाडा मागील काही दिवसांपासून विविध आंदोलनांनी तापलेला आहे. त्यातच आता जालन्यात जिल्हा बँक निवडणूक प्रक्रिया सुरु असताना ही घटना घडली आहे. दरम्यान, घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी व पथक दाखल झाले आहे.
कोणी केला हल्ला ? काय म्हणाले आ. टोपे?
जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक असल्याने आज बिनविरोध निवडणुकीची प्रक्रिया यादृष्टीतने पार पडलेली आहे. परंतु यात विघ्न आणण्यासाठी काही असंतुष्ट लोकांनी गाडीवर दगडफेक केली. या प्रकरणी पोलिसांनी कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई करावी असं म्हटलं आहे. तसेच त्यांना शिक्षाही व्हायला हवी असं म्हटलं आहे.