‘एमआयएम’च्या प्रस्तावावर भाजप-शिवसेनेची सडेतोड प्रतिक्रिया

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2022 Maharashtra Politics :- महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसोबत आघाडी करण्याचा प्रस्ताव औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे.

यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र शिवसेना व भाजपनेही यावर सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे, ’जो पक्ष औरंगजेबाच्या कबरीपुढे झुकतो. तो शिवसेना, महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील जनतेचा विरोधकच आहे.

त्यामुळे त्यांच्याशी आघाडी शक्यच नाही.’ राष्ट्रवादीचे नेते, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि खासदार जलील यांच्यात भेट झाली. त्या भेटीत आपण राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याचा प्रस्ताव दिल्याचे जलील यांनी प्रसार माध्यमांना सांगितले. त्यानंतर याचे पडसाद उमटू लागले आहेत. शिवसेनेने ही शक्यताही फेटाळून लावली आहे.

खासदार राऊत म्हणाले, ‘एमआयएमसोबत आघाडी करणं हा विचारही एक गंभीर आजार आहे. एमआयएम हा पक्ष भाजपची टीम बी आहे.

एमआयएमसोबत उघड किंवा छुपी युती करण्याचा प्रश्नच नाही. काही लोकांची अशी छुपी युती आहे, पण ती त्यांची त्यांनाच लखलाभ,’ अशा शब्दांत राऊत यांनी हा प्रस्ताव फेटाळला आहे.

भाजपकडून विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे, ‘एमआयएम’नं राष्ट्रवादीसोबत जावं. ते शेवटी एकच आहेत.

शिवसेना आणि ‘एमआयएम’ कसे एकत्रं येतात ते पाहू. शिवसेनेनं हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकारलेलं आहे,’ अशी टीकाही त्यांनी केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe