राज्यांतून व केंद्रातून भाजपची सत्ता जाईल व राहुल गांधी देशाचे पंतप्रधान होतील

Maharashtra News : राज्यातील भाजपप्रणित तसेच देशातील केंद्र सरकारविरोधात लोकांमध्ये मोठी चीड असल्याचे संवाद यात्रेच्या माध्यमातून दिसून येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सरकार जाईलच,

पण कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशप्रमाणे इतर राज्यांतून व केंद्रातून भाजपची सत्ता जाईल व राहुल गांधी देशाचे पंतप्रधान होतील, असा जनतेचा कौल असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पटोले यांनी भाजप सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या नावाच्या अद्याक्षरानुसार टीका करत ते म्हणाले, ईडीचं सरकार इंडीए अर्थात लोकशाही न मानणारे बीजेपी प्रणित येड्याच सरकार असल्याची उपरोधिक टीका त्यांनी केली.

आगामी निवडणुका जिंकायच्या असून त्याकरीता मेरिटच्या आधारावर तोडीचे उमेदवार दिले जाणार आहेत. त्यामुळे उमेदवारी आत्ता घोषित करणे संयुक्तिक नाही. निवडणुका लागतील त्यावेळेस कोणता उमेदवार कुठून निवडणूक लढवेल, याची आम्ही यादी जाहीर करू. तोपर्यंत त्यावर भाष्य करणे योग्य नाही, पावणेदोन वर्षे झाले, तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरकारने या घेतल्या नाहीत, त्यावरून हे सरकार किती घाबरलेले आहे, हे दिसून येत आहे.

कर्नाटक हिमाचल प्रदेशप्रमाणे अनेक राज्यांतून भाजपच्या हातून सत्ता जायला लागली आहे. त्यामुळे केंद्रातूनही भाजपच्या हातून सत्ता जाणार असल्याचे बघायला मिळेल आणि देशाचे पंतप्रधान राहुल गांधीच बनतील, असा लोकांचा कौल आहे.

ओबीसी समाजाचे शोषण करणे, हा भाजपचा पायंडा राहिला आहे. ओबीसींची दिशाभूल केली जाते. ओबीसींची शिष्यवृत्ती पाच वर्षे झाली अजून मिळाली नाही. जाती-धर्मात भांडणे लावून इंग्रजांप्रमाणे डिव्हाईड अँड रुल नीतीचा अवलंब करत निवडणुका घेण्याचा भाजपचा डाव आहे.

नांदेड दुर्घटनेच्या बाबतीत बोलताना ते म्हणाले, की राजस्थानच्या धर्तीवर महाराष्ट्रातसुद्धा आरोग्याचा कायदा करून तो शासकीय व खासगी सर्वच रुग्णालयांना बंधनकारक करावा. कुठल्याही रुग्णालयात पैसे डॉक्टर, औषधे, टेक्निशियन अथवा सुविधांअभावी रुग्णांचा जीव जाता कामा नये, याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. हे सरकार लोकांच्या जीवावर उठल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला.