अपहृत शिवसेना पदाधिकाऱ्याचा मृतदेह गुजरातच्या खाणीत सापडला ; कारच्या डिकीतील गोणीत कोंबले होते अशोक धोडींना

Sushant Kulkarni
Published:

१ फेब्रुवारी २०२५ डहाणू : गेल्या बारा दिवसांपासून बेपत्ता असलेले शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी अशोक धोडी यांचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. गुजरातमधील भिलाड येथील एका बंद दगडखाणीतील पाण्याच्या डबक्यातून शुक्रवारी बाहेर काढण्यात आलेल्या त्यांच्या कारच्या डिकीत एका गोणीत त्यांचे शव कोंबून ठेवले होते. धोडी यांच्या कुटुंबीयांकडून अपहरणाचा आणि घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला होता. तो खरा ठरल्यामुळे धोडी यांच्या शोकसंतप्त कुटुंबीयांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला होता.

डहाणू विधानसभा मतदारसंघासाठी समन्वयक असलेल्या अशोक धोडी यांचा लहान भाऊ अविनाश धोडी याच्यावर कुटुंबीयांनी अपहरणाचा आरोप केला होता. त्यामुळे घोलवड पोलिसांनी चौकशीसाठी त्याला बोलावले. मात्र, अंधाराचा फायदा घेत अविनाश धोडी पोलीस चौकीतून फरार झाल्यावर गुरुवारीच धोडी कुटुंबीयांनी पोलिसांची आरोपींशी मिलीभगत असल्याचा आरोप केला होता.

गेले काही दिवस सातत्याने दै. ‘पुण्यनगरी’ने हे प्रकरण लावून धरले होते. धोडी कुटुंबीयांच्या आरोपांना प्रसिद्धी मिळाल्यावर मात्र चमत्कार झाल्यागत चोवीस तासांत वेगाने चक्रे फिरली आणि शुक्रवारीच पोलिसांना सरिगाम परिसरातील या खाणीचा आणि त्यात बुडालेल्या कारचाही शोध लागला.

सीसीटीव्ही फुटेजमुळे मिळाला माग

पालघर पोलिसांनी तपासादरम्यान गुजरातमधील भिलाड परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यात ब्रेझा कार दिसून आली.मग सरिगाम परिसरातील एका बंद दगडखाणीत ४०-५० फूट खोल पाण्यात या गाडीचा शोध पाणबुड्यांच्या मदतीने घेण्यात आला,तेव्हा ही कार तळाशी असल्याचे पोलिसांना लक्षात आले. सुमारे १२ तासांच्या प्रयत्नांनंतर क्रेनच्या साहाय्याने गाडी बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले. गाडीची तपासणी केल्यावर डिकीमध्ये एका गोणीत अशोक धोडी यांचा मृतदेह आढळला. कुटुंबीयांनी या मृतदेहाची ओळख पटवली.

कौटुंबिक वादातून हत्या

पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, कौटुंबिक वादातून अविनाश धोडीने सख्ख्या भावाची हत्या केली. २० जानेवारी रोजी झाई बोरीगाव या घाटात कट रचून त्याने अशोक धोडी यांचे अपहरण करून त्यांची हत्या केली. मृतदेह ब्रेझा कारच्या डिकीमध्ये ठेवून गाडी सरिगाम येथील बंद खदानीत ढकलण्यात आली.

मुख्य आरोपी अद्याप फरार

या प्रकरणातील मुख्य आरोपी अविनाश धोडी आणि आणखी दोन आरोपी फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे.त्यांच्या शोधासाठी गुजरात आणि राजस्थानमध्ये पोलिसांची आठ पथके पाठवण्यात आली आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आधी अटक केलेल्या चार आरोपींना डहाणू न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe