अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2022 Maharashtra news :- शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्याविरूद्ध ब्राम्हण समाज आक्रमक झाला आहे. “आमचे हिंदुत्व शेंडी-जानव्याचे नाही’, या राऊत यांच्या वक्तव्याबद्दल त्यांचा निषेध करण्यात येत आहे.
खासदार राऊत यांनी माफी मागावी अन्यथा नगरमध्ये दशक्रिया विधी घालून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नगर जिल्हा ब्राम्हण सेवा संघाचे अध्यक्ष किशोर जोशी यांनी दिला आहे.
जोशी यांनी सांगितले की, एका भाषणात राऊत यांनी हे वादग्रस्त विधान केले. यामुळे अखिल ब्राम्हण समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.
सत्तेसाठी हापपलेल्या शिवसेनेने विधानसभा निवडणुकीनंतर आपले हिंदुत्व इतर पक्षाच्या दावणीला बांधून हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसैनिकांचा विश्वासघात केला आहे.
शिवसेनेच्या स्थापनेवेळी ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहणारे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यासह अनेक सेनेचे नेते ब्राम्हणच होते.
शिवसेनेच्या इतिहासात जोशी यांच्या इतकी निष्ठा शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याने दाखविलेली नाही. या गोष्टीचा राऊत यांना विसर पडलेला दिसतोय.
शेंडी जानव्याचेचे ब्राम्हण्य माहित नसणाऱ्या राऊत यांनी पुराणाचा इतिहासाचा अभ्यास करावा. २१ वेळा पृथ्वी निःक्षत्रिय करणारे भगवान परशुराम हे ब्राम्हणांचे आद्यगुरू आहेत.
तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या बल्लाळ भटांना पेशवे पदाची जबाबदारी दिली, ते ही ब्राम्हणच होते. राजकारणातल्या द्वेषापायी जर ब्राम्हण समाजावर अशी टीका करणार असाल, तर येत्या काळात त्यांना त्यांची जागा व लायकी दाखवून देण्यात येईल, असा इशाराही जोशी यांनी दिला आहे.