नाशिक पुणे महामार्गावर एसटीला जॅक लावणाऱ्या बसचालकास टेम्पोने चिरडले

Ahilyanagarlive24 office
Updated:

Maharashtra News : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसचे टायर पंक्चर झाल्याने बसचालक पंक्चर काढण्यासाठी जॅक लावत होता, त्यावेळी पाठीमागून भरधाव येणाऱ्या टेम्पोची बसला जोराची धडक बसली.

यात बसचालक ठार झाला. हा अपघात शनिवारी (दि. १२) पहाटे ३:५५ वाजेच्या सुमारास नाशिक पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील १९ मैल नांदूरखंदरमाळ येथे घडला.

मयूर आनंदा मुंढे (वय ४५, रा. दत्तचौक, सिडको, नाशिक) असे अपघातातील मयत बसचालकाचे नाव आहे. संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हा अपघात आहे. या प्रकरणी पुणे जिल्ह्यातील आळेफाटा पोलिस ठाण्यात बसवाहक संदीप नामदेव खोडे (रा. सातपूर, जि. नाशिक) यांनी खबर दिली आहे.

रात्री १२:०५ वाजेच्या सुमारास बसचालक मुंढे आणि वाहक खोडे हे दोघे नंदूबार पुणे ही बस (एमएच २० बीएल ४०९४) पंचवटी डेपो, नाशिक येथून घेऊन पुण्याकडे जात असताना पहाटे २:३० वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील १९ मैल नांदूरखंदरमाळ येथे या बसचे टायर पंक्चर झाले.

या बसमधील प्रवासी दुसऱ्या बसमध्ये बसवून दिल्यानंतर त्यांच्या बसमधील असलेल्या जॅकने बस उचलली जात नव्हती. पाठीमागून नवापूर- पुणे बस येत असताना त्या बसचे चालक अरुण रमेश शेलार यांच्याशी मुंढे आणि खोडे यांनी संपर्क साधून त्यांच्या बसमधील दुसरा जॅक घेतला.

त्यानंतर रात्री ३:५५ वाजता चालक मुंढे बसचे टायरला जॅक लावत असताना नाशिकहून पुण्याच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या आयशर टेम्पोची (एचआर ४७, ई ४०७८)ची नंदूरबार पुणे बसला जोराची धडक बसली.

या अपघातात पंक्चर काढत असलेले चालक मुंढे गंभीर जखमी झाले. वाहक खोडे यांनी नवापूर- पुणे बसचे चालक शेलार यांच्याशी संपर्क करत त्यांना अपघात घडल्याचे सांगत पाठीमागे बोलावून घेतले.

शेलार हे बस घेऊन आल्यानंतर जखमी मुंढे यांना उपचारासाठी आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe