गेल्या काही वर्षांपासून कमी पावसामुळे डाळींच्या उत्पादनावर परिणाम झाला होता, त्यामुळे मागील वर्षी तूरडाळ, चणाडाळ आणि उडीद डाळ यांचे दर २०० रुपये प्रति किलोच्या पातळीवर पोहोचले होते. मात्र, यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांमधून मोठ्या प्रमाणात डाळींची आवक होत आहे. विशेषतः कर्नाटकमध्ये तूरडाळीचे उत्पादन वाढले असून, त्यामुळे तूरडाळीच्या दरात ५०-६० रुपयांनी घसरण झाली आहे.

बाजारातील सध्याची स्थिती
डाळी आणि कडधान्यांची आयात देखील वाढली असल्याने, पुरवठा जास्त असून मागणीच्या तुलनेत आवक अधिक होत आहे. त्यामुळे डाळींचे दर आवाक्यात आले आहेत.
पूर्वीचे दर: तूरडाळ: १६०-२०० रुपये प्रति किलो, हिरवा वाटाणा: २५० रुपये प्रति किलो
आताचे दर: तूरडाळ: ११०-१२० रुपये प्रति किलो हिरवा वाटाणा: १२० रुपये प्रति किलो
गृहिणींना मोठा दिलासा
गृहिणींच्या रोजच्या स्वयंपाकासाठी तूरडाळ, मसूर, मूग आणि चणाडाळ महत्त्वाच्या असतात. मागील काही महिन्यांत महागाईमुळे डाळींची किंमत जास्त असल्याने गृहिणींना बजेट सांभाळावे लागत होते. मात्र, आता मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाल्यामुळे महागाईचा फटका बसणार नाही.
विशेषतः हरभरा, तूर आणि हिरवा वाटाणा यांच्या जादा उत्पादनामुळे दर आणखी कमी होण्याची शक्यता व्यापारीवर्गाकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे ग्राहकांना चांगल्या किमतीत डाळी मिळण्याचा फायदा होईल.
व्यापारी काय म्हणतात
APMC बाजारातील घाऊक व्यापारी मेहुल भानुशाली यांच्या म्हणण्यानुसार, “यंदा डाळींच्या नवीन उत्पादनाची मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे. तसेच डाळींची आयातही वाढली आहे, त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा जास्त असल्याने बाजारात दर कमी झाले आहेत.”