श्रीगोंदे तालुक्यातील बनपिंप्री येथे एका हॉटेलमध्ये अवैधरीत्या वास्तव्यास असलेल्या चार बांगलादेशी तरुणींना दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली आहे. या तरुणींनी भारतात येण्यासाठी कोणतेही अधिकृत कागदपत्र वापरले नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात परकीय नागरिक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कसे झाले उघडकीस
नाशिक येथील दहशतवाद विरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय नलावडे यांना मिळालेल्या माहितीवरून बनपिंप्री येथील न्यू होटेल प्रशांतमध्ये छापा टाकण्यात आला. हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर चार तरुणी संशयास्पद अवस्थेत आढळल्या.

बांगलादेशी नागरिक असल्याची कबुली
तपासादरम्यान या तरुणींनी स्वतःच्या खरी ओळख लपवण्याचा प्रयत्न केला, मात्र चौकशीत त्या बांगलादेशी नागरिक असल्याचे स्पष्ट झाले. त्यांची खरी नावे पुढीलप्रमाणे आहेत:मुरसनिला अख्तर सिकंदर (बनावट नाव – जुई जियारेल मंडल), रोमाना अख्तर रुमी (बनावट नाव – मिता आकाश शिंदे), सानिया रॉबीऊल इस्लाम खान (बनावट नाव – मिम मंडल), सानिफा अबेद अली खान (बनावट नाव – सानिफा जाहिद मंडल)
बेरोजगारीला कंटाळून घुसखोरीचा निर्णय
या चौघींनी भारतात येण्यामागे बेरोजगारीला कंटाळून चांगल्या संधीच्या शोधात असल्याचे कारण दिले. मात्र, त्यांनी भारतात येण्यासाठी कोणतेही अधिकृत पासपोर्ट किंवा व्हिसा घेतला नसल्याचे तपासात स्पष्ट झाले.
बांगलादेशातील नातेवाईकांशी आयएमओ अॅपद्वारे संपर्क
या तरुणी बांगलादेशातील नातेवाईकांशी आयएमओ अॅपद्वारे संवाद साधत होत्या. त्यांच्या मोबाईलमधील कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये बांगलादेशचा कंट्री कोड (+880) असलेले अनेक क्रमांक सापडले, ज्यामुळे त्यांची खरी ओळख स्पष्ट झाली.
घुसखोरीच्या साखळीचा तपास सुरू
या तरुणी बनपिंप्रीत कशा आल्या, त्यांना आश्रय कोणी दिला, बनावट आधार आणि पॅन कार्ड कसे मिळाले, याचा शोध पोलीस घेत आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांच्या भारतात येण्यामागे मोठे नेटवर्क कार्यरत असण्याची शक्यता आहे. या प्रकरणात श्रीगोंदे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घुसखोरीच्या या गंभीर प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.