राज्यातील MPSC परीक्षेत यश मिळवलेल्या 498 उमेदवारांची अखेर नियुक्ती झाली असून, शासनाने नियुक्तीचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवड झालेल्या उमेदवारांचे अभिनंदन केले असून, हे उमेदवार लवकरच शासन सेवेत रुजू होणार आहेत.
498 उमेदवारांना गट-A आणि गट-B सेवांमध्ये नियुक्ती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्यसेवा परीक्षेत यश मिळवलेल्या गट-A आणि गट-B मधील 498 उमेदवारांना आता नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. यामध्ये – गट-A: 229 उमेदवार, गट-B: 269 उमेदवार यासंदर्भातील शासन निर्णय शुक्रवारी जारी करण्यात आला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः ही माहिती दिली आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रशासकीय कारणांमुळे या उमेदवारांच्या नियुक्त्या रखडल्या होत्या. अखेर शासनाने ही प्रक्रिया पूर्ण करत 498 उमेदवारांची निवड निश्चित केली आहे.

कुठल्या पदांसाठी निवड झाली आहे?
या भरती प्रक्रियेद्वारे विविध महत्त्वाच्या प्रशासकीय पदांसाठी उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये –उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, पोलीस उपअधीक्षक (DYSP), सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP), सहाय्यक राज्यकर आयुक्त, गट विकास अधिकारी, मुख्याधिकारी, शिक्षणाधिकारी, बालविकास अधिकारी, उपशिक्षणाधिकारी, कक्ष अधिकारी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, सहाय्यक गट अधिकारी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी हे सर्व उमेदवार लवकरच शासनाच्या सेवेत रुजू होणार आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियुक्त्या मिळालेल्या उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (ट्विटर) वर पोस्ट करत म्हटले – “महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेत यशस्वी झालेल्या गट-A आणि गट-B मधील 498 उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. त्यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो! त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा.” या पोस्टसोबतच शासन निर्णयाचे अधिकृत पत्रक देखील जोडण्यात आले आहे.