३ जानेवारी २०२५ बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील तीन फरार आरोपींचा घटनेच्या तीन आठवड्यांनंतरही पोलिसांना व नंतर सीआयडी पथकाला शोध लागलेला नाही.खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडची सीआयडी कोठडीत रवानगी करण्यात आल्यानंतर दोन दिवसांपासून अधिकारी त्याची चौकशी करत आहेत.
असे असतानाच मस्साजोग येथे बुधवारी ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन करत फरार आरोपी तत्काळ पकडण्याची मागणी केली. त्या अनुषंगाने आता सीआयडीचे पथक फरार सुदर्शन घुलेसह कृष्णा आंधळे व सुधीर सांगळे या तिघांचा शोध घेत आहेत.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी दुपारी अपहरण करत आरोपींनी हत्या केली होती. या प्रकरणात केज पोलिसांकडून सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याच प्रकरणात पोलीस निरीक्षक महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असून केज पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे.
सभागृहात या गंभीर मुद्द्यावर चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली करत त्यांच्या जागी नवनीत काँवत यांची नियुक्ती केली आहे. दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणासह खंडणी व अॅट्रॉसिटी अॅक्टप्रमाणे तीन स्वतंत्र गुन्हे केज ठाण्यात दाखल आहेत.
सीआयडीची ९ पथके करताहेत तपास
पोलीस महासंचालकांच्या आदेशावरून हे सर्व गुन्हे आता सीआयडीकडे वर्ग करण्यात आले आहेत. बुधवारी ‘एसआयटी’ची स्थापना झाली. ९ डिसेंबर पासून तीनही आरोपी पसार असून ते नेमके राज्यात की राज्याबाहेर गेले, या अनुषंगानेही तपास केला जात आहे.आरोपींसाठी सीआयडीकडून वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेतला जातः आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीआयडीची एकूण ९ पथके तयार करण्यात आली असून त्यामध्ये जवळपास १५० जणांचा समावेश आहे.
नातेवाईकांकडून चौकशी
सरपंच हत्या प्रकरणात घुले, आंधळे व सांगळे अजूनही फरारच आहेत. ते नेमके कुठे आहेत, या अनुषंगाने सीआयडीचे अधिकारी कसून तपास करत आहेत. बुधवारी दुपारी या फरार आरोपींच्या कुटुंबातील सदस्यांना चौकशीसाठी सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी बीड शहर ठाण्यात बोलावले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
‘ते’ पाच पलंग कर्मचाऱ्यांसाठीच !
खंडणीच्या गुन्ह्यात सीआयडी कोठडीतल्या वाल्मिक कराडला चौकशीसाठी बीड शहर ठाण्यात आणल्याच्या दुसऱ्या दिवशी बीड पोलीस प्रशासनाकडून शहर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांसाठी पाच पलंग आणण्यात आले होते.दरम्यान, यामुळे वेगळी चर्चा झाली.
याबाबत प्रतिक्रिया देताना अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर म्हणाले की, बीड शहर पोलीस स्टेशनची इमारत नव्याने बांधण्यात आलेली आहे. जुन्या पोलीस ठाण्यातून या नव्या ठाण्यात स्थलांतर केलेले आहे. अधिकारी व अंमलदारांसाठी आवश्यक सुविधा पुरवणे सुरू आहे.
या ठिकाणी आरोपीसाठी जे गार्ड ड्युटीवर असतात, त्यांना आराम मिळावा म्हणून काही गार्डने आमच्याकडे पलंगाची मागणी केली होती. त्यानुसार हे पलंग गार्डसाठी मुख्यालयातून पोहोचवलेले आहेत.दरम्यान, आरोपीला पोलीस ठाण्यात आणल्यानंतरच हे पलंग येथे आले.हा निव्वळ योगायोग असल्याचेही सचिन पांडकर यांनी स्पष्ट केले.