Maharashtra News : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावी व दहावीच्या लेखी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर झाले आहे.
बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च २०२४ या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा १ ते २६ मार्च २०२४ या कालावधीत होणार आहे.
राज्य शिक्षण मंडळाने यापूर्वी संभाव्य वेळापत्रक जाहीर केले होते. यानंतर हे वेळापत्रक अंतिम करण्यात आले आहे. दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा १० फेब्रुवारी ते २९ फेब्रुवारी २०२४ व बारावीची प्रात्यक्षिक,
श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. मंडळाकडून दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर २ नोव्हेंबरपासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
बारावीच्या माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांची ऑनलाइन परीक्षा २० ते २३ मार्च २०२४ या कालावधीत होणार आहे. विद्यार्थ्यांनी छापील वेळापत्रकावरून परीक्षांच्या तारखांची खात्री करून घ्यावी व परीक्षेस प्रविष्ठ व्हावे.
अन्य संकेतस्थळांवरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले, तसेच सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, अशी सूचना मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केली आहे.