Maharashtra News : सुपा एमआयडीसीतील पळवे खुर्द गावच्या शिवारातील असलेल्या व्यंकटेश पॉलिकोर प्रा.लि., या कंपनीला आग लागण्याची घटना घडली. या भीषण आगीत कंपनीतील शेड व साहित्य, असे एकूण ८ कोटी ८५ लाखांचे नुकसान झाले आहे.
आगीची ही घटना (दि. २१) एप्रिल रोजी पहाटे १ वाजेच्या सुमारास घडली. ही आग कंपनीतील एका कामगारानेच लावली असल्याचे सांगण्यात येते.
याबाबत कंपनीचे प्लांट हेड हरिद्वार नंदलाल प्रसाद (रा. शिरूर, जि. पुणे) यांनी सुपा पोलिस ठाण्यात शुक्रवारी (दि.२६) सायंकाळी फिर्याद दिली आहे. आग लागण्यामागील कारणाचा शोध घेतला असता,
त्या दिवशी रात्रपाळीला असलेला कामगार विशाल भाऊसाहेब गायकवाड (रा. जातेगाव, ता. पारनेर) कंपनीच्या पाठीमागील शेडमध्ये जाऊन माचीसमधील काडी ओढून प्लास्टिकचे फिनिश गुड पेटवल्याने काही वेळातच आगीचा भडका होऊन आग सर्वत्र पसरली व कंपनीचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले.
याबाबत हरिद्वार प्रसाद यांनी सुपा पो. ठाण्यात कामगार विशाल गायकवाड याच्याविरोधात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गायकवाड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.