Nilwande Water : निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून अखेर काल पाणी सोडण्यात आले आहे. निळवंडे पाट कालवा कृती समितीने पाणी सोडण्याच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली होती. निळवंडेच्या उजव्या कालव्याचेही काम लवकर पूर्ण करा, अशी मागणी माजी महसूलमंत्री आमदार बाळसाहेब थोरात यांनी केली आहे.
निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडावे, उजव्या कालव्यांचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, यासाठी आमदार थोरात यांनी सातत्याने मागणी केली होती. निळवंडे कृती समितीनेही १३ सप्टेंबर रोजी मोठे आंदोलन केले होते.
यावर प्रशासनाच्या वतीने ३० सप्टेंबर रोजी पाणी सोडण्याचे आश्वावासन दिले होते. पावसाच्या आगमनामुळे कालव्याच्या दुरुस्तीचे काम लांबणीवर पडल्याने १० ऑक्टोबर रोजी पाणी सोडण्यात येईल, असे आश्वासन जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता हापसे यांनी दिले होते.
१० तारखेलाही पाणी न सोडल्याने कृती समितीचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. शुक्रवारी त्यांनी पुन्हा जलसंपदा अधिकाऱ्यांची भेट घेतली. शनिवारी सकाळी पाणी सोडण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
या आश्वासनाप्रमाणे काल सकाळी डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे संगमनेर तालुक्यासह डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
याबाबत आमदार थोरात यांनी म्हटले, की उत्तर अहमदनगर जिल्ह्यात कमी पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून भंडारदरा व निळवंडे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून डाव्या कालव्यातून तातडीने पाणी सोडावे, ही आपली सातत्याने मागणी राहिली आहे.
याचबरोबर उजवा कालवा ही तातडीने पूर्ण झाला पाहिजे. अकोले तालुक्यातील शेतकरी, नागरिक यांनी कालव्यांच्या कामासाठी कायम मोठे सहकार्य केले आहे. त्यांना विश्वासात घेतले पाहिजे. उजव्या कालव्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून टेस्टिंग करून सर्व गावांनाही त्वरित पाणी द्यावे, अशी मागणीही आमदार थोरात यांनी केली आहे.