Sambhaji Maharaj यांच्याबद्दल Wikipedia वर वादग्रस्त लिखाण ! त्या चार संपादकांवर गुन्हा दाखल

Published on -

मुंबई, २२ फेब्रुवारी २०२५: छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रासंदर्भात विकिपीडियावर आक्षेपार्ह माहिती प्रकाशित करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप झाला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलने विकिपीडियाच्या चार संपादकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिले होते.

सायबर सेलने विकिपीडियाला अनेक ई-मेल पाठवले, मात्र कोणताही प्रतिसाद नाही
महाराष्ट्र सायबर सेलने विकिपीडियाकडून विवादित मजकूर हटविण्यासाठी अनेक ई-मेल आणि नोटिसा पाठवल्या, परंतु तीन दिवस उलटल्यानंतरही विकिपीडियाकडून कोणतेही उत्तर आले नाही. त्यामुळे, बीएनएस ६९ आयटी कायदा आणि कलम ७९ च्या उल्लंघनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकिपीडियाने समाजात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला असून, चुकीची माहिती प्रसारित करून लोकांच्या भावना दुखावण्याचा हा प्रकार आहे, असे सायबर सेलने स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्र्यांचे कठोर आदेश – अशा घटनांवर तत्काळ कारवाई करावी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांना निर्देश दिले की, विकिपीडियाशी त्वरित संपर्क साधावा आणि आक्षेपार्ह मजकूर हटवावा. तसेच, भविष्यात अशा प्रकारची चुकीची माहिती प्रसारित होऊ नये, यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत.

सायबर विभागाने विकिपीडियाला १० ते १२ वेळा नोटिसा पाठवल्या, मात्र उत्तर न मिळाल्याने गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात सायबर क्राईम कायद्यानुसार अधिक चौकशी सुरू असून, दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्रात प्रचंड संताप – जनतेकडून कठोर कारवाईची मागणी

या घटनेमुळे महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली असून, विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांनी यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. संभाजी महाराज हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असून, त्यांच्यावरील चुकीच्या माहितीचा प्रसार महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही, असा इशारा काही संघटनांनी दिला आहे.

विकिपीडियाला यापुढे अधिक जबाबदारीने वागावे लागणार

विकिपीडिया हा संपादकांद्वारे चालवला जाणारा मुक्त ऑनलाइन ज्ञानकोश आहे, परंतु या घटनेमुळे त्याच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सरकार आणि प्रशासनाने आशय संपादित करण्यासाठी कठोर मार्गदर्शक तत्त्वे आणि मॉनिटरींग यंत्रणा आवश्यक आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe