मुंबई : आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि राष्ट्रवादी (Ncp) हा वाद दिवसोंदिवस वाढत आहे. आता या वादाने वेगळे वळण घेतले असून पडळकर यांनी आक्रमकपणे पवारांवर टीका केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Punyashlok Ahilya Devi Holkar) यांच्या जयंतीनिमित्त चौंडीत आमदार गोपीचंद पडळकर यांनी भाषणात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) व आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर अत्यंत आक्रमक भाषेत बोचरी टीका केली आहे.
यामुळे पार्श्वभूमीवर पडळकर यांच्यावर कर्जत पोलीस ठाण्यात (Karjat police station) चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\
काय आहे सगळा प्रकार?
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९७ व्या जयंतीच्या निमित्ताने चौंडीत मंगळवारी पवार विरुद्ध पडळकर असा संघर्ष पाहिला मिळाला. जयंतीनिमित्त आमदार रोहित पवार यांनी चौंडी येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाला शरद पवारही उपस्थित होते. याठिकाणी जाण्यासाठी निघालेल्या गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्या गाड्यांचा ताफा पोलिसांनी अडवला.
यावरुन पडळकर आणि खोत यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. त्यावेळी शरद पवार यांच्यावर बोचरी टीका पडळकर यांनी केली. धनगर समाजातील विविध संघटनांनीच पडळकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
कलम 505 (2) अन्वये पडळकर यांच्याविरोधात कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. समाजा-समाजात तेढ निर्माण करणे, चिथावणीखोर वक्तव्य करणे, अशा कलमाखाली पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल केला गेला आहे. त्यामुळे पडळकर यांच्या अडचणी वाढ झाल्याचे चित्र स्पष्ट आहे.