अहमदनगर, नाशिक जिल्ह्यावर पाणीटंचाईचे गडद संकट !

Ahmednagarlive24 office
Published:
Maharashtra News

Maharashtra News : यंदा पावसाने सर्वत्रच ओढ दिली. महाराष्ट्रासह अहमदनगर जिल्ह्यातही पाऊस कमीच पडला. त्यामुळे मुळा धरण देखील पुरेसे भरलेले नाही. यातच आता जायकवाडी धरणात पाणी सोडण्याची मागणी होऊ लागली आहे.

मागील वर्षी जायकवाडी धरण संपूर्ण भरले होते. परंतु यातील पाण्याचा बेसुमार वापर झाला. जायकवाडीतून गेल्या वर्षभरात रब्बी व उन्हाळी हंगामात सात आवर्तने घेण्यात आली. त्यामुळे शंभर टक्के भरलेल्या या धरणातील साठा अवघ्या ३३ टक्क्यांपर्यंत खाली आला.

त्यामुळे आता जायकवाडीच्या या वारेमाप पाणीवापरामुळे नाशिक व नगर जिल्ह्यांतील धरण समूहातून समन्यायी कायद्यानुसार मराठवाड्याला पाणी सोडण्याचे संकट ओढवले आहे. असे जर झाले तर या ढसाळ पाणी नियोजनाचा फटका अहमदनगर, नाशिक जिल्ह्यांना बसणार आहे.

असा झाला बेसुमार वापर

मागील वर्षी पाऊस चांगला झाला होता. त्यामुळे जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. या धरणातून रब्बी हंगामात तीन आवर्तने घेण्यात आली. त्याचबरोबर शेतीसाठी तब्बल चार उन्हाळी आवर्तने सोडण्यात आली.

एकूण १०२ टीएमसी क्षमतेच्या या धरणातून ६७ टीएमसी पाण्याचा वापर करण्यात आला. पिण्यासाठी व औद्योगिक वापराला ६ टीएमसी पाणी खर्च झाले. सात आवर्तनात खर्च झालेल्या या पाण्यामुळे साठा अवघा ३३ टक्के अर्थात ३५ टीएमसी शिल्लक राहिला.

अहमदनगर, नाशिक जिल्ह्यावर पाणीटंचाईचे गडद संकट

नगर व नाशिक जिल्ह्यांतील पाणलोटात यंदा कमीच पाऊस पडला. त्यामुळे गोदावरी भरभरून वाहिली नाही. त्यामुळे जायकवाडीत पाणी अपेक्षेप्रमाणे आले नाही. नगर व नाशिक जिल्ह्यात पाऊस कमी झाल्याने खरीप हंगाम मोठ्या प्रमाणावर वाया गेला.

आता नगर व नाशिक जिल्ह्यांतील धरण समूहातून किमान रब्बीसाठी पाणी मिळून चारा पिके, गहू, कांदा पिके हाती लागतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. मात्र, त्यातच समन्यायीमुळे जायकवाडीत पाणी सोडण्याची मागणी मराठवाड्यातून जोर धरत आहे. असे झाले तर रबी मधील पिकांवर देखील विपरीत परिणाम होईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe