सध्या राज्यात लाडकी बहीण योजनेचीच चर्चा आहे. दरम्यान आता लाभार्थी महिलांच्या खात्यात रक्षाबंधनाच्या दिवशी तीन हजार रुपये जमा होतील. महिलांनी सक्षम झाले पाहिजे तसेच आत्मनिर्भर व्हावे यासाठी लाडकी बहीण ही योजना महायुतीने आणली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला निवडून द्यायचे आहे.
निवडून नाही दिले, तर ही योजना मला नीट राबवता येणार नाही, असे सांगतानाच आता हौसे-नौशे-गौशे आमची योजना कशी चुकीची आहे, हे सांगायला येतील, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी केले आहे. बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल,
प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, कृषीमंत्री धनंजय मुंडे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, खासदार सुनेत्राताई पवार, क्रीडामंत्री संजय बनसोडे, महिला प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आदींसह पक्षाचे आमदार,
पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अजित पवार म्हणाले की, वरुणराजाने वर्षाव करून आपल्याला एकप्रकारे पाठिंबाच दिला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच तुमच्यासमोर आज ‘जनसन्मान’ रॅलीच्या माध्यमातून उभा आहे. जनतेचा विकास आणि गरीब लोकांना मदत करण्याच्या हेतूने आम्ही प्रयत्न करत आहोत आणि हाच विचार आम्ही विधानसभा निवडणुकीत राज्याच्या कानाकोपऱ्यांत जाऊन सर्व जनतेला सांगणार आहोत.
लोकसभेत आपल्याला अपयश आले, परंतु त्याने खचून जायचे नाही आणि विधान परिषद निवडणुकीत यश आले म्हणून हुरळून जायचे नाही. यश पण पचवायला शिकले पाहिजे आणि नव्या उमेदीने लोकांसमोर जाण्याची तयारी ठेवली पाहिजे आणि तीच तयारी माझ्या सहकाऱ्यांनी ठेवली आहे, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
विधान परिषद निवडणुकीत शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांना दिलेला शब्द मी खरा करून दाखवला आहे. मी शब्दाचा पक्का आहे. जो वादा असतो तो पक्का असतो. हे उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. ज्यावेळी मला अर्थ खाते मिळाले, त्यावेळी मी जनतेचा विकास करताना गरिबी दूर करायची आहे, असा निर्णय घेतला होता आणि त्या पद्धतीने पावले उचलली असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.