कमी होणारे दूध दर आणि वाढत्या पशुखाद्याच्या किमती, यावर सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही !

Ahilyanagarlive24 office
Published:

Maharashtra News : राज्यात सतत घसरत जाणारे दुधाचे दर आणि कर्जत – जामखेडमध्ये सुरू असलेला विजेचा खेळखंडोबा, या प्रश्नी महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनता दरबार कार्यक्रमात

भाजपाचे तालुकाध्यक्ष शेखर खरमरे यांनी भेट घेऊन जनतेच्या प्रश्नांकडे ना. विखे यांचे लक्ष वेधून या प्रश्नांमुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष असल्याचा इशारा देत एक प्रकारे घरचा आहेरच दिला आहे.

राज्यात सातत्याने कमी होणारे दूध दर आणि वाढत्या पशुखाद्याच्या किमती, यावर सरकारचे कोणतेही नियंत्रण राहिलेले नसल्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. महाराष्ट्र सरकारने दूध दराबाबत जो जीआर जारी केला होता,

त्याप्रमाणे दुधाला ३५ रुपये दर मिळत नाही, याबाबत आमदार प्रा. राम शिंदे यांनी विधान परिषद सभागृहात अभ्यासपूर्ण विवेचन केले होते. त्याप्रमाणे दूधदराबाबत सरकारने निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे ‘भाजपाचे तालुकाअध्यक्ष शेखर खरमरे यांनी केली आहे.

त्याचप्रमाणे कर्जत- जामखेडमध्ये शेतकऱ्यांना वीजजोडणी तसेच नवीन वीज रोहित्र मिळण्यासाठी मोठा मनःस्ताप सहन करावा लागत आहे. पिकांना द्यायला पाणी आहे; परंतु विजेचा लपंडाव चालू असल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

वीज वितरण कंपनीकडून वीज रोहीत्र जळाल्यानंतर ते मिळत नाही, शेतकरीच लोकवर्गणी करून रोहीत्र आणतात, त्याला जोडणी मिळत नाही, अशा अनागोंदी कारभारामुळे शेतकरी हवालदिल आहे. नविन रोहित्रासाठी जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध करून शेतकऱ्यांच्या जीवनातील अंधःकार दूर करावा, असे निवेदनात म्हटले आहे.

सध्या राज्यात महायुतीचे सरकार असून, यामध्ये भाजपा हा सर्वात मोठा घटक पक्ष आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या तालुकाध्यक्षांनी सरकारला वास्तव दाखवण्याचे काम जाहीरपणे केले आहे. याबाबत खरमरे यांना विचारले असता, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या अडचणी सरकार पुढे मांडणे ही आमची जबाबदारी आहे.

मतदारसंघातील शेतकरी व नागरिकांना आम्ही बांधील आहोत. सरकारने सर्वसामान्यांचे प्रश्न लक्षात घेऊन काम करण्याची गरज असून, त्यादृष्टीने काम केले पाहिजे, असे आपल्याला वाटत असल्याने आपण या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले असल्याचे म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe