Maharashtra news : गेल्या काही काळापासून भाजपच्या अनेक नेत्यांवरून कडवी टीका करणाऱ्या दीपाली सय्यद यांनी एका ताज्या ट्विटमध्ये आपण मूळच्या भोसले असल्याचा उल्लेख केला आहे. ‘महाराष्ट्रद्रोह्यांना भोसल्यांची लेक पुरून उरणार.’ असा उल्लेख त्यांनी केला आहे. सय्यद सध्या शिवसेनेत आहेत.
त्यांच्या मुस्लिम अडनावामुळे सोशल मीडियातून त्यांना वेगळ्या प्रकारे ट्रोल केले जात असल्याचे आढळून येते. या पार्श्वभूमीव त्यांनी हा उल्लेख केल्याचा अंदाज आहे. दीपाली भोसले सय्यद यांचा जन्म बिहारमधील पटणा येथे झाला. त्यांनी दिग्दर्शक बॉबी खान उर्फ जहांगीर सय्यद यांच्याशी लग्न केले.
लग्नानंतर त्यांचे नाव सोफिया जहांगीर सय्यद असे ठेवण्यात आले. त्या दीपाली सय्यद या नावाचे ओळखू जावू लागल्या. त्यांच्या कुटुंबाचा अहमदनगर जिल्ह्याशी संबंध असल्याने २०१४ मध्ये त्यांनी आम आदमी पक्षातून निवडणूक लढवली होती. पण त्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
साकळाई पाणी योजनेसाठी त्यांनी काही दिवसांपूर्वी आंदोलन केले होते. अद्यापही नगर जिल्ह्यात त्या सामाजिक कार्यातून सक्रिय आहेत. २०१९ मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. अलीकडे नवनीत राणा आणि अन्य भाजपच्या नेत्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्याने त्यांना प्रत्युत्तर देण्याचे काम दीपाली सय्यद करीत आहेत.