ST News : महाराष्ट्र एसटी बसेसना पूर्णत: टोलमुक्त करण्याची मागणी

Ahmednagarlive24 office
Published:
ST News

ST News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे व सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे यांच्यात नुकतीच टोलसंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत खाजगी वाहनांच्या टोल मुक्तीबाबत विस्तृत चर्चा होत काही निर्णयांवर सकारात्मक चर्चा झाली.

मात्र, दुसऱ्या बाजूला राज्याच्या सर्वांगीण विकासात मोठा वाटा असलेल्या व राज्यातील खेड्यापाड्यातील गरीब प्रवासी जनतेचे एकमेव साधन असलेल्या एसटीकडून होत असलेल्या गैरवाजवी टोल वसुलीबाबतीत साधी चर्चाही झाली नाही, हे दुर्दैवी असून सरकारला गरिबांच्या एसटीचा विसर पडला आहे का?

असा सवाल महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, एसटी बसेसना पूर्णतः टोलमुक्त करावे, अशी मागणीदेखील बरगे यांनी या वेळी केली.

एसटीच्या साधारण साडेचौदा हजार गाड्या प्रत्यक्ष रस्त्यावर धावत असून, त्यातून दररोज ५२ लाख प्रवासी व दररोज साधारण ६० ते ७० हजार फेऱ्या होत आहेत. रस्त्यावर प्रत्यक्ष धावणाऱ्या प्रत्येक गाडीमागे एसटीला टोल भरावा लागत असून, त्यामुळे एसटी महामंडळाला दरवर्षी सरासरी १६२ ते १६७ कोटी रुपये इतका टोल भरावा लागत आहे.

विविध कारणांमुळे महामंडळाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून, एसटीचा संचित तोटा ९००० कोटी रुपयांच्या घरात असून, पुरवठादारांची आजही ८५० कोटी रुपयांची देणी प्रलंबित आहेत.

अशातच ज्येष्ठ नागरिक महिलांना शासनाने दिलेल्या प्रवासातील सवलतीमुळे व कर्मचाऱ्यांच्या व व्यवस्थापनाच्या अथक प्रयत्नांमुळे महामंडळ नफ्याच्या जवळ पोहोचले आहे. आता मासिक तोटा कमी झाला असून,

मासिक तूट फक्त २४ कोटी रुपये इतकी खाली आली आहे. एसटीला टोलमधून मुक्ती दिल्यास नफ्याच्या एकदम जवळ पोहचू शकते व त्यामुळे साहजिकच राज्यातील गरीब प्रवासी जनतेला अजून चांगल्या सवलती देता येतील व दिलासा मिळू शकेल.

या शिवाय महामंडळासमोरील आर्थिक अडचणीसुद्धा दूर होऊ शकतील. त्यामुळे पुढील बैठकीत सरकारने एसटी बसला लागणाऱ्या टोल वसुलीबाबतीत सुद्धा फेरविचार करून टोलमधून एसटीला पूर्णतः मुक्ती द्यावी, अशी मागणीही बरगे यांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe