ठाणे- ठाण्यात मेट्रो वर्षअखेरीस सुरू करण्याचा मानस असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ठाणे महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा हौशी अॅथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ वी वर्षा मॅरेथॉन रविवारी ठाण्यात उत्साहात पार पडली. या स्पर्धेला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी झेंडा दाखवल्यानंतर उपस्थितांशी संवाद साधला.
शिंदे म्हणाले की, मुंबई एमएमआरमध्ये मेट्रोचे जाळे मजबूत करण्यात येणार आहे. त्यामुळे रस्त्यावरची वाहतूक कमी होईल. मेट्रोचे काम आम्ही टप्प्याटप्याने सुरू करणार असून, त्याला इंटर्नल मेट्रो जोडणार असल्याचे सांगितले. ठाण्यातील इंटर्नल मेट्रो मंजूर झाली असून, त्याची पुढील प्रक्रिया सुरू झाल्याचे ते म्हणाले.

ठाणे महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकारी, वाहतूक विभाग यांची मी बैठक घेऊन त्यांना ठाणे वाहतूक कोंडीमुक्त करण्याचे टास्क दिले आहे. त्यावर मी स्वतः जातीने लक्ष देणार असून, काही काळाने ठाणे शहरातील वाहतूक कोंडी दूर झालेली दिसेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
वर्षा मॅरेथॉनमध्ये सहभागी धावपटूंचा उत्साह पाहून मॅरेथॉनला झेंडा दाखवल्यानंतर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मॅरेथॉनमध्ये धावण्याचा आनंद घेतला. त्यांनी धावपटूंसमवेत काही अंतर धावून त्यांचा उत्साह वाढवला. या वेळी त्यांच्यासह खासदार नरेश म्हस्के, आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे यांच्यासह इतर अधिकारी यांनीही धावण्याचा आनंद घेतला.
दोन लाख झाडे लावणार
ठाणे शहरात या वर्षी दोन लाख झाडे लावण्याचा मानस आहे. ठाणे शहरातील बुजलेल्या जोगीला तलावाला पुनरुजीवन दिले जाणार असून, ही एक ऐतिहासिक घटना आहे. ठाणे महानगरपालिका खेळाडूंना वर्षा मॅरेथॉनच्या माध्यमातून व्यासपीठ देते. स्व. सतीश प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षा मॅरेथॉन सुरू झाली ती ठाण्यापुरती मर्यादित न राहता देशभरात गेली वर्षा मॅरेथॉनचे आयोजन ठाणे महापालिकेने उत्कृष्ट केले असून, शिंदे यांनी आयुक्त सौरभरावं आणि महापालिका प्रशासनाचे कौतुक केले
त्यांना पराभव पचवता येत नाही
लोकसभेत जिंकल्यानंतर त्यांनी आरोप केला नाही; परंतु विधानसभा हरले तेव्हा त्यांचे ईव्हीएम आणि निवडणूक आयोगावर आरोप सुरू झाले. कुठल्याही परिस्थितीत त्यांना पराभव पचवता येत नसल्याचा टोला शिंदे यांनी विरोधकांना मारला. राहुल गांधींनी आरोप करण्यापेक्षा न्यायालय, निवडणूक आयोगाकडे जावे, असे सुचवत काम करणाऱ्यांच्या मागे महाराष्ट्रातील जनता उभी राहते, असे शिंदे यांनी नमूद केले.