नवरात्रोत्सवात मतदारसंघातील महिलांसाठी देवीदर्शन ! आमदार नीलेश लंके यांचं नियोजन उपमुख्यमंत्री अजित पवारही राहणार उपस्थित…

Ahmednagarlive24 office
Published:

Maharashtra News : दरवर्षी नवरात्रोत्सवात मतदारसंघातील महिलांसाठी आमदार नीलेश लंके यांच्या संकल्पनेतून काढण्यात येणाऱ्या मोहटादेवी यात्रेच्या प्रस्थानासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत.

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हेही यावेळी हजेरी लावणार असल्याची माहिती आमदार नीलेश लंके यांनी दिली.

आमदार नीलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने या यात्रेचे आयोजन केले आहे. सोमवारी (दि. १६) हंगा येथून यात्रेचा प्रारंभ होणार आहे. जिल्हा परिषदेच्या सुपा गटातील सुपा व वाडेगव्हाण गण तसेच पारनेर शहरातील सर्व प्रभागातील महिला या यात्रेत सहभागी होणार आहेत.

मागील वर्षी खासदार सुप्रिया सुळे, रूपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत मोहटादेवी यात्रेचा प्रारंभ झाला होता. लंके हे आमदार झाल्यानंतर सुरुवातीस पिंपळनेर येथे व येत्या सोमवारी हंगा येथे अजित पवार येत आहेत.

दि. १७ ऑक्टोबरला निघोज गटातील निघोज, अळकुटी गणातील महिला, दि. १८ रोजी कान्हूर पठार गटातील कान्हूर व जवळा गण, दि. १९ रोजी टाकळी ढोकेश्वर गटातील टाकळी ढोकेश्वर व कर्जुले हर्या गण,

दि.२० रोजी ढवळपुरी गटातील ढवळपुरी, भाळवणी गण, दि. २१ रोजी सारोळा कासार, चास, कामरगाव गावे, दि. २२ रोजी देहरे, नांदगाव, कर्जुने खारे, जखणगाव येथील महिला यात्रेत सहभागी होणार आहेत.

महिला भाविकांच्या यात्रेसाठी दररोज २२५ बसेसची सोय केली आहे. २० बसेस राखीव ठेवण्यात येणार आहेत. २०० बसेसमधून काही बसेसचा खोळंबा झाल्यास त्या ठिकाणी राखीव बसेस पाठविण्याचे नियोजन केले आहे. यात्रेदरम्यान महिलांसाठी फराळ, चहा पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. प्रत्येक बससोबत प्रतिष्ठान, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते स्वयंसेवक म्हणून असतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe