Nashik News : गंगापूर धरणातून जायकवाडीसाठी होणारा विसर्ग बंद

Ahmednagarlive24 office
Published:
Nashik News

Nashik News : मराठवाड्यातील जायकवाडी धरणासाठी नाशिकमधील गंगापूर धरणातून सोडण्यात आलेला पाण्याचा विसर्ग मंगळवारी बंद करण्यात आला. गंगापूर धरणातून रविवारी ५०० दशलक्ष घनफूट इतके पाणी सोडण्यात आले.

दोन दिवस हा विसर्ग सुरू होता. जायकवाडीच्या हक्काचे पाणी वितरीत केल्यानंतर मंगळवारी पाणी बंद करण्यात आले.

जायकवाडी धरणासाठी गेल्या २४ नोव्हेंबर रोजी दारणा धरणातून रात्री पाणी सोडण्यात आले. त्यानंतर रविवारी सकाळी मुकणे, गंगापूर आणि कड़वा या तीन धरणांमधून पाणी सोडण्याचे मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने निर्णय घेतला.

त्यानुसार या तिन्ही धरणांतून पाणी सोडण्यात आले. यापैकी गंगापूर धरणातून अर्धा टीएमसी पाणी सोडण्यात आले. पाणी सोडण्याच्या हस्तक्षेप याचिकांवर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने स्थगितीस नकार दिल्यामुळे नाशिक जिल्हा प्रशासनाने पाणी सोडण्याचे नियोजन केले होते.

रविवारी गंगापूर धरणातून ५०० क्यूसेक इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना, तसेच नागरिकांना जलसंपदा विभाग व जिल्हा प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला होता.

नाशिक शहरासह जिल्ह्यातही पर्जन्यमान समाधानकारक न झाल्याने या भागात आधीच पाण्याचे संकट निर्माण झालेले असल्याने पाणी सोडण्यात येऊ नये, अशी मागणी नाशिकच्या लोकप्रतिनिधीनी शासनाकडे केली होती,

तसेच गंगापूर धरणातून पाणी सोडण्याऐवजी राज्य शासनाने जायकवाडीतील मृतसाठा वापरण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र गंगापूर धरणातून ५०० दशलक्ष घनफूट पाणी जायकवाडीसाठी देण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe