Maharashtra CM : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. शिंदे यांच्या या दिल्ली दौऱ्यामुळे राज्यात मुख्यमंत्री बदलाची चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे.
त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्या ऐवजी मुख्यमंत्रीपदी अजित पवार यांची निवड होईल, अशी आशा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना लागून राहिली आहे. याच अपेक्षेने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सोशल मीडियावर अजित पवार मुख्यमंत्री होणारच, अशा आशयाच्या पोस्ट फिरवू लागले आहेत.
नुकत्याच झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानाबाहेर देखील ‘मुख्यमंत्री अजित पवार अशा आशयाचे पोस्टर त्यांच्या समर्थकांकडून लावण्यात आले होते.
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील एक ट्विट करून अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत भाष्य केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी मी अजित अनंत पवार, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो, ‘लवकरच अजित पर्व येणार’ असे म्हटले आहे.
मिटकरी यांच्या या ट्विटमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक मात्र चांगलेच भडकले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी ‘मिटकरी दमानं, सरकार काम करतंय जोमानं ! तुम्ही यात मिठाचा खडा टाकणं बंद करा,’ अशा शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.
तर शिंदे गटाचे दुसरे प्रवक्ते संजीव भोर पाटील यांनी ‘उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग’ असा मिटकरींचा उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली आहे. एकंदरीतच मुख्यमंत्रीपद बदलाच्या चर्चांमुळे सोशल मीडियावर राजकीय द्वंद्व चांगलेच रंगले आहे. महायुतीमधील दोन घटक पक्षाचे नेते आपल्या नेत्यांच्या मुख्यमंत्रीपदावरून एकमेकांचे वाभाडे काढताना दिसत आहेत.