Maharashtra News : दिवाळी अवघ्या दोन दिवसांवर आल्याने आनंदाचा शिधा वाटप मोहीम युद्धपातळीवर हाती घेण्यात आली आहे. अवघ्या सहा दिवसांत ५४ लाख शिधा राज्य सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून वाटप करण्यात आला आहे.
उर्वरित दोन दिवसांत जास्तीत जास्त शिधा वाटप करण्याचा प्रयत्न आहे. शनिवार, रविवार या सुट्टीच्या दिवशी देखील शिधा वाटपाचे काम करण्यात येणार आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून देण्यात आली.
राज्य सरकार राज्यातील जनतेला सणासुदीच्या काळात अत्यल्प दरात पाच जीवनावश्यक वस्तू आनंदाचा शिधा या योजनेअंतर्गत देते. यापूर्वी गणेशोत्सव, पाडवा आणि आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने जनतेला हा आनंदाचा शिधा शिधापत्रिकेवर उपलब्ध करून दिला होता. आता दिवाळीच्या निमित्तानेही तो देण्यात येत आहे.
राज्यातील अकरा कोटी पन्नास लाख जनतेसाठी ५४९४६ रास्त भाव दुकाने कार्यरत आहेत. एकूण एक कोटी ६६ लाख ७१ हजार ४८० शिधापत्रिकाधारक आहेत. यापैकी एक कोटी ५८ लाख शिधापत्रिकाधारकांना या आनंदाचा शिधा योजनेचा लाभ देण्यात येतो.
आतापर्यंत राज्यातील ५५ लाख ३३ हजार ९७६ म्हणजेच जवळपास ५५ टक्के शिधापत्रिकाधारकांपर्यंत आनंदाचा शिधा पोहोचला आहे, अशी , माहिती अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे वरिष्ठ अधिकारी महेश जाधव यांनी दिली.