अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- केंद्र सरकारने वेळोवेळी केलेल्या मदतीमुळेच महाराष्ट्र कोरोनाच्या विळख्यातून सावरू शकला, अन्यथा घरकोंबड्या ठाकरे सरकारच्या सल्ल्यानुसार कोमट पाणी पिऊन करोनाविरोधातील केविलवाणी झुंज सुरूच राहिली असती,
असा टोमणा भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या खासदार डॉ. हिना गावित यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून हाणला जनादेश धुडकावून फसवणुकीने सत्तेवर आलेल्या ठाकरे सरकारने कोरोना काळात भ्रष्टाचार,
धोरणलकवा आणि ढिसाळपणामुळे महाराष्ट्राला कडेलोटाच्या खाईत लोटल्याने कोरोनाविरोधी लढ्यातील सर्वात अपयशी राज्य म्हणून महाराष्ट्राची नोंद झाली आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
कोरोना काळात मंत्रालयातून पळ काढून घरात कोंडून घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रास वाऱ्यावर सोडून संकटाशी सामना करण्याची जबाबदारीही नागरिकांवरच ढकलली.
या अपयशास ‘मी जबाबदार’ असे नागरिकांकडून वदवून घेताना, स्वतःच्या कुटुंबाची सुरक्षितता सांभाळत ‘माझे कुटुंब एवढीच माझी जबाबदारी’, असा बेजबाबदार बाणाही दाखविला, अशा शब्दात गावित यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकाही केली.
आपत्ती निवारण निधीतून केंद्राने दिलेल्या दोन हजार कोटींच्या निधीतून कोणत्या उपाययोजना केल्या, याचा हिशेब जनतेस द्यावा तसेच सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळेच जनतेकडे दुर्लक्ष होऊन हजारो मृत्यू ओढवल्याने या अपयशाची जबाबदारी घेऊन दोन वर्षांच्या कारभाराची काळी पत्रिका जारी करावी, अशी मागणीही गावित यांनी केली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम