कोल्हापूर- निसर्गाच्या कुशीत वसलेले आणि महाराष्ट्राचे ‘प्रतिमहाबळेश्वर’ म्हणून ओळखले जाणारे ठिकाण म्हणजे आंबोली धबधबा आणि परिसर होय. मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यामुळे हा प्रसिद्ध धबधबा जूनपासूनच प्रवाहित झाला. विशेष म्हणजे जुलैच्या सुरुवातीलाही पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने हा धबधबा जोरदार कोसळत आहे.
वरून पडणारे पाणी, पाण्याचा शुभ्र प्रवाह आणि सर्वत्र पसरलेली दाट धुक्याची चादर असे काहीसे मनोहारी दृश्य आंबोली परिसरात पाहायला मिळत आहे.

केवळ राज्यच नव्हे, तर देशभरातील पर्यटकांना आंबोली साद घालतो, त्यामुळे वर्षा पर्यटनाला इथे गर्दी पाहायला मिळत आहे. परिसरातील आंबोली, गेळे आणि चौकूळ ही तीन गावे नयनरम्य निसर्गसौंदर्य, घनदाट धुके, फेसाळणारे धबधबे आणि जैवविविधतेसाठी वर्षा पर्यटकांची पसंतीची ठिकाणे आहेत.
दरवर्षी महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकसह देशभरातून लाखो पर्यटक आंबोलीचा पाऊस, धुके आणि निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी येत असतात. पावसाळ्यातील पहिले दोन-तीन महिने या ठिकाणी पर्यटकांची नेहमीच रेलचेल असते. परिसरात असणारी छोठी-मोठी हॉटेल्स, चहाच्या टपऱ्या आणि गरमागरम भजी-वड्यासाठी आसुसलेली तरुणाई इथे पाहायला मिळते.
देशभरातून आलेल्या पर्यटकांना आंबोली घाटातील धबधबे, नांगरतास धबधबा, हिरण्यकेशी नदीचा उगम, महादेव गड पॉईंट, वनबाग, फुलपाखरू उद्यान यांसारखी विविध पर्यटनस्थळे आकर्षित करतात. याव्यतिरिक्त गेळे येथील कावळेसाद पॉईंट आणि चौकूळमधील विविध पर्यटनस्थळे पर्यटकांच्या मनाला भुरळ घालतात.
कावळेसाद, महादेव गड आणि आंबोली धबधबा या ठिकाणी होत असलेली गर्दी विचारात घेता सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पेट्रोलिंग करत आहेत. त्यामुळे या परिसरात बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिसांचा उत्साह दुणावला आहे. विशेष म्हणजे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून रात्रंदिवस चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. शुक्रवारपासून श्रावण महिन्याला प्रारंभ होत असल्याने आगामी दोन दिवसांत चांगलीच गर्दी अनभवायला मिळणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
माजी मंत्री केसरकर यांचा पुढाकार
दरवर्षी वाढत जाणारे पर्यटक, होणारी गर्दी विचारात घेऊन माजी शालेय शिक्षणमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी वन विभागाला पर्यटकांसाठी दोन वाहने देण्याच्या सूचना दिल्या आहेत. ही वाहनेही वन व्यवस्थापन समितीच्या ताब्यात दिल्यामुळे आंबोली पर्यटनाला अधिक महत्त्व प्राप्त झाले असून, गर्दीचा उच्चांक दिसत आहे.