महाराष्ट्रात बर्ड फ्लूने गंभीर स्थिती निर्माण केली आहे. लातूर, ठाणे आणि उदगीरसारख्या ठिकाणी बर्ड फ्लूने शेतकरी, पोल्ट्री व्यवसाय आणि सामान्य नागरिकांना भयभीत केले आहे. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात 4200 पिल्लं अचानक दगावल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.
कावळ्यांना सुद्धा सोडलं नाही
केवळ पोल्ट्री फार्मच नाही तर उदगीर शहरात 60 कावळ्यांच्या मृत्यूमुळेही बर्ड फ्लूची पुष्टी झाली आहे. या घटनेमुळे स्थानिक प्रशासन आणि पशुवैद्यकीय विभागाला सतर्कतेच्या पातळीवर काम करावे लागत आहे.
पोल्ट्री व्यवसायाला मोठा धक्का
लातूरच्या ढालेगाव येथील पोल्ट्री फॉर्ममध्ये काही दिवसांत हजारो पिल्लं मृत झाल्यामुळे स्थानिक पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. सुरुवातीला या घटनेचं कारण अज्ञात होतं. मात्र, सॅम्पल तपासण्यासाठी पुण्याच्या प्राण्यांसंबंधित प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. याच वेळी, उदगीरमध्ये मृत झालेल्या कावळ्यांवर केलेल्या तपासणीने बर्ड फ्लूची पुष्टी केली आहे, ज्यामुळे प्रशासनाला आणखी सतर्क व्हावे लागत आहे.
ठाणे शहरात बर्ड फ्लूचा शिरकाव
ठाण्यातील कोपरी परिसरात बर्ड फ्लूने थेट पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या सरकारी निवासस्थानातील कोंबड्यांपर्यंत शिरकाव केला आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने कारवाई करत एक किलोमीटर परिसरातील सर्व कोंबड्या नष्ट केल्या आहेत. ठाणे पालिकेने संसर्ग रोखण्यासाठी पाच फेब्रुवारीपर्यंत मांसाहार विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
बर्ड फ्लू उपाययोजना
बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभाग आणि स्थानिक प्रशासनाने कडक उपाययोजना सुरू केल्या आहेत. कोंबड्या, कावळे यांसारख्या पक्ष्यांच्या मृत्यूची घटना कुठेही आढळल्यास त्वरित जिल्हा पशुवैद्यकीय विभागाला कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, मांसाहार करणाऱ्यांनी स्वच्छता आणि योग्य प्रक्रियेचे पालन करावे, असेही सुचवण्यात आले आहे.
सतर्कतेचा इशारा
बर्ड फ्लूच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. पोल्ट्री व्यवसायावर याचा मोठा परिणाम झाला असून, चिकन आणि अंडी खरेदी करणाऱ्यांनीही काळजी घेण्याची गरज आहे. प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी जागरूकता ठेवत परिस्थिती हाताळणे अत्यावश्यक आहे.