कोल्हापूर दौऱ्यात एकनाथ शिंदेच्या अडचणी वाढणार! शक्तिपीठ विरोधी शेतकरी गनिमी काव्याने ताफा रोखणार

शक्तिपीठ महामार्ग रद्दीकरणाचे आश्वासन न पाळल्याने कोल्हापुरातील शेतकरी एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याला विरोध करणार आहेत. कुणाल कामराचे गाणे वाजवून निषेध नोंदवणार आहेत.

Published on -

कोल्हापूर- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज (५ एप्रिल) कोल्हापूर दौऱ्यावर असून त्यांचा हा दौरा विविध कारणांनी वादग्रस्त ठरत आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी कोल्हापुरात शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याचे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते.

मात्र, सत्ता आल्यावर या मुद्द्यांवर कोणतीही ठोस कृती न केल्याचा आरोप महायुती सरकारवर होत आहे. त्यामुळे शक्तिपीठ विरोधी कृती समिती आणि शेतकरी संघटनांनी या दौऱ्याच्या विरोधात आवाज उठवला आहे.

शक्तिपीठ महामार्गावरून वाद

शक्तिपीठ महामार्ग हा कोल्हापूरमधील अनेक गावांमधून जाणार असून त्याविरोधात स्थानिक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. शिंदे यांनी निवडणुकीपूर्वी महामार्ग रद्द करण्याचे आश्वासन दिले होते.

पण सरकारकडून कुठलीही स्पष्ट भूमिका न घेतल्यामुळे शेतकरी आणि कृती समितीने आंदोलन उभारले आहे. महामार्गासाठी शेतजमिनींचा ताबा घेतला जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त होईल, असा दावा आंदोलक करत आहेत.

*कुणाल कामराचे वाजवणार गाणे

शक्तिपीठ विरोधी कृती समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंच्या कोल्हापूर दौऱ्याच्या वेळी ‘गणिमी काव्याने’ निषेध नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये प्रसिद्ध स्टँडअप कलाकार कुणाल कामराच्या राजकीय आणि प्रक्षोभक गाण्यांचा वापर केला जाणार आहे.

हे गाणे लावून आंदोलक शांततापूर्ण पद्धतीने, पण ठामपणे शिंदेंच्या ताफ्याला विरोध करणार आहेत. फोंडे यांच्या मते, सत्तेच्या लालसेपोटी जनतेची फसवणूक करणाऱ्या नेत्यांना आता मैदानात परत फिरू देणे योग्य नाही.

रस्त्यातच नोंदवणार निषेध

एकनाथ शिंदे यांची सभा राधानगरीतील खोराटे हायस्कूलच्या मैदानावर होणार आहे. ते कोल्हापूर विमानतळावरून हेलिकॉप्टरने बिद्री येथे जातील आणि नंतर मोटारीने आदमापूरमार्गे सभा स्थळी पोहोचतील. हे सर्व मार्ग शक्तिपीठ महामार्गाच्या मार्गरेषेत येत असल्याने आंदोलनकर्त्यांनी मार्गातच निषेध करण्याचे ठरवले आहे. हे आंदोलन शांततेत पण ठसठशीत असेल, असे कृती समितीने स्पष्ट केले आहे.

गिरीश फोंडे यांचे निलंबन

प्राथमिक शिक्षक गिरीश फोंडे यांच्यावर उपमुख्यमंत्र्यांविरोधात वक्तव्य केल्याच्या आरोपावरून महापालिकेने तात्काळ निलंबनाची कारवाई केली. सोशल मीडियावर त्यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या प्रकारामुळे आंदोलकांमध्ये संतापाची लाट आहे. ही कारवाई दडपशाहीची असल्याचा आरोप कृती समितीकडून करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांची ठाम भूमिका

गोकुळ दूध संघाचे संचालक प्रकाश पाटील यांनी स्पष्ट सांगितले की कोल्हापुरातील एकही शेतकरी शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनात नाही. राज्याची आर्थिक परिस्थिती खालावलेली असताना ८६ हजार कोटी रुपये कर्ज काढून महामार्ग उभारणे हास्यास्पद असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
या पैशांचा वापर शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच, सरकार दलालांच्या मदतीने आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

एकनाथ शिंदे यांचा कोल्हापूर दौरा केवळ राजकीय कार्यक्रम न राहता, शेतकऱ्यांच्या असंतोषाचे केंद्रबिंदू ठरतो आहे. आश्वासने देऊन त्यांची पूर्तता न करणाऱ्या नेत्यांविरोधात जनतेमध्ये चीड वाढत आहे. आगामी काळात शक्तिपीठ महामार्ग आणि शेतकरी प्रश्नी सरकारला अधिक तीव्र विरोधाला सामोरे जावे लागणार हे निश्चित आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News