Maharashtra News : महाराष्ट्र राज्य वीज वितरण लाईन्स स्टाफ बचाव कृती समितीच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यासाठी वीज कर्मचाऱ्यांचे क्रमबद्ध आंदोलन सुरू असून
आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्यात कर्मचाऱ्यांनी महावितरण कंपनीने दिलेले मोबाईल नंबर पुन्हा परत केले आहेत. लाईन कर्मचाऱ्यांच्या मोबाईल बंद आंदोलनामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागणार आहे.

याबाबत वीज वितरण तिसगाव कक्षाच्या वतीने सहाय्यक अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वीज कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या संदर्भात शासनाने कुठलीही दखल घेतलेली नाही.
आंदोलनाचे दोन टप्पे पूर्ण झाले असून ३० ऑक्टोबरपासून तिसरा टप्पा सुरू होत आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने दिलेले मोबाईल क्रमांक आम्ही परत करत आहोत. ग्राहकांना त्रास देण्याचा आमचा उद्देश नसून आमच्या मागण्या सरकारच्या निदर्शनात आणण्यासाठी आंदोलन आहे.
ग्राहकांना अडचणी आल्यास कक्ष अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन वरिष्ठ तंत्रज्ञ किरण मरकड यांनी केले आहे. या निवेदनावर प्रधान तंत्रज्ञ सुभाष बांगर, वरिष्ठ तंत्रज्ञ किरण मरकड, भारत गोसावी, राहुल बडवे, प्रमोद मरकड, विशाल इंगळे, निलेश उगार, अनिल राजळे आदींच्या सह्या आहेत.













