१९ फेब्रुवारी २०२५ मुंबई : राज्यात अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स स्थापन करण्यास तसेच त्याकरिता ३४६ पदांना व त्यासाठीच्या खर्चास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी मंजुरी देण्यात आली.राज्यात अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स स्थापन करण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आली आहे. या फोर्ससाठी आवश्यक असणाऱ्या ३४६ पदांच्या प्रस्तावास मंगळवारी मंजुरी देण्यात आली.
यापैकी ३१० पदे नियमित तर ३६ पदे बाह्य यंत्रणेकडून भरली जाणार आहेत.त्यासाठी १९ कोटी २४ लाख १८ हजार ३८० रुपये तर वाहन खरेदीसह ३ कोटी १२ लाख ९८ हजार ३८० रुपयांस मान्यता देण्यात आली.राज्य अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्समध्ये मनुष्य बळाची भरती केल्यानंतर अमली पदार्थ प्रतिबंधक उपाय योजनांची कडक अंमलबजावणी करणे, तपासणीमध्ये वाढ करून कायद्याचा धाक निर्माण करणे व कायद्याच्या चौकटीत राहून दोषींवर कठोर कारवाई करणे शक्य होणार आहे.

त्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक एक, पोलीस उपमहानिरीक्षक एक, पोलीस अधीक्षक तीन, अपर पोलीस अधीक्षक तीन, पोलीस अधीक्षक १०, पोलीस निरीक्षक १५, सहाय्यक पोलीस निरीक्षक १५, पोलीस उपनिरीक्षक २०, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ३५, पोलीस हवालदार ४८, पोलीस शिपाई ८३ तसेच आणखीही काही पदे बाह्य यंत्रणेद्वारे भरली जाणार आहेत.
पुण्यातील मंगेशकर हॉस्पिटलला जमीन
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर फाऊंडेशन हॉस्पिटल, मेडिकल रिसर्च सेंटरला नाल्यावरील पुलाच्या बांधकामासाठी वार्षिक भाडेपट्ट्याने नाममात्र दराने जमीन देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.या ट्रस्टला हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटरसाठी एरंडवण्यात जमीन देण्यात आली आहे.
ट्रस्टने कर्वेनगर येथे जमीन खरेदी केली आहे.या दोन जमिनीच्या दरम्यान नाला असून त्यावर पूल बांधण्यासाठी ७९५ चौ. मीटर जमिनीची आवश्यकता असल्याची मागणी ट्रस्टने केली होती.त्यानुसार ही जमीन वार्षिक १ रुपया या नाममात्र दराने भाडेपट्ट्याने देण्यास मंजुरी देण्यात आली.नाल्यावरील पुलाच्या बांधकामाचा खर्च संबंधित ट्रस्ट करणार आहे.या पुलामुळे रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक, रुग्णवाहिका, रुग्णांच्या नातेवाईकांचे वाहने व ट्रस्टचे संबंधित वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी यांना ये-जा करणे सुकर होणार आहे.