Mumbai Nature Trail | मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात निसर्गाचा अनुभव घेणं म्हणजे एक आव्हानच वाटतं. ट्राफिक, गर्दी आणि धावपळीच्या जीवनशैलीत श्वास घेण्यासारखी शांत जागा शोधणं कठीण असतं. मात्र आता मुंबईकरांसाठी अशीच एक हरित संधी उपलब्ध झाली आहे. मलबार हिलवरील एलिवेटेड नेचर ट्रेल म्हणजेच फॉरेस्ट वॉकवे पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. ही महाराष्ट्रातील पहिली अशा प्रकारची ट्रेल असून, शहरात राहूनही झाडांच्या उंच शेंड्यावरून चालत जंगल आणि समुद्राचं सौंदर्य अनुभवता येणार आहे.
फॉरेस्ट वॉकवेची वैशिष्ट्ये-
या ट्रेलची एकूण लांबी 485 मीटर असून, ही नेचर ट्रेल कमला नेहरू पार्कपासून सुरू होऊन डोंगरवाडीच्या घनदाट जंगलांपर्यंत पसरते. सुमारे 20 फूट उंचीवर आणि 2.4 मीटर रुंद असलेल्या या मार्गाच्या दोन्ही बाजूंना गुलमोहर, बदाम, जांभूळ, वड यांसारखी झाडं आहेत. या वॉकवेवर चालताना झाडांच्या सान्निध्यात, पक्ष्यांच्या किलबिलाटात निसर्गसौंदर्याचा अनुभव घेता येतो. सिंगापूरच्या ‘ट्री टॉप वॉक’वरून प्रेरणा घेऊन ही ट्रेल उभारण्यात आली आहे.

या ट्रेलवर पक्षी निरीक्षकांसाठी खास ‘बर्डव्यू पॉइंट’ तयार करण्यात आले आहे. येथे बसून किंगफिशर, बुलबुल, टिया यांसारख्या पक्ष्यांचं निरीक्षण करता येतं. याशिवाय, एक ग्लास-बॉटम डेकही आहे ज्यातून पायाखालचं जंगल स्पष्टपणे दिसतं. जैवविविधतेचं थेट दर्शन घडवणारी ही ट्रेल काही वेळा साप, सरडे, अजगर यांसारख्या प्राण्यांचेही दर्शन घडवते. त्यामुळे ही केवळ चालण्याची जागा न राहता, निसर्ग अभ्यासकांसाठी महत्त्वाचं ठिकाण बनते.
या ट्रेलच्या शेवटी ‘सी व्ह्यू डेक’ आहे, जिथून गिरगाव चौपाटी आणि अथांग अरबी समुद्राचं मनमोहक दृश्य दिसतं. झाडांमधून समुद्राकडे पाहणं ही एक विलक्षण अनुभूती आहे. अशा ठिकाणी थोडा वेळ घालवल्यानं मानसिक शांतता आणि ताजेपणा मिळतो, हेही या ठिकाणाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे.
वेळ आणि शुल्क
ही ट्रेल दररोज सकाळी 5 ते रात्री 9 या वेळेत सर्वांसाठी खुली आहे. भारतीय पर्यटकांसाठी तिकीट शुल्क 25 रुपये असून, विदेशी पर्यटकांसाठी ते 100 रुपये आहे. प्रवेशद्वार कमला नेहरू पार्कच्या मागे असलेल्या सिरी रोडवरून आहे आणि तिकीट ऑनलाइन बुक करता येते. त्यामुळे ट्रेलमध्ये प्रवेश करणे अत्यंत सुलभ आणि सोयीचं ठरतं.
मुंबईसारख्या शहरात पर्यावरण रक्षण आणि निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीने अशा हरित उपक्रमांचं महत्त्व अधिकच वाढतं. ही ट्रेल लहान मुलांना आणि नव्या पिढीला निसर्गाशी जोडण्याचा एक प्रभावी मार्ग ठरू शकतो. शहरात राहूनही जंगलाचा अनुभव देणारी ही ट्रेल आता पर्यटकांसाठी नवी आकर्षणस्थळ बनली आहे