Expressway Project In Maharashtra:- वाढवण बंदर आणि इगतपुरी यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी एक महत्वाकांक्षी द्रुतगती महामार्ग बांधण्याचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या महामार्गाचा उद्देश वाढवण बंदर आणि इगतपुरी यांच्यातील अंतर केवळ एका तासात पार करण्याचा आहे.
ज्यामुळे दोन्ही ठिकाणांमधील कनेक्टिव्हिटी सुधारली जाईल. 118 किमी लांबीच्या या महामार्गाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) करणार आहे. हा महामार्ग विशेषत: मुंबई-सुरत समृद्धी महामार्गाशी जोडला जाणार आहे.जो नंतर चारोटी-इगतपुरी दरम्यान 85.38 किमी लांबीच्या मार्गापर्यंत पुढे जाईल.

या प्रकल्पाची अंमलबजावणी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.कारण या मार्गामुळे मुंबई आणि पालघर जिल्ह्यांमधील औद्योगिक विकासाला मोठा हातभार लागेल. यामध्ये पालघरमधील 33 तर नाशिकमधील 9 गावांचा समावेश आहे. ज्यातून महामार्ग जात असताना स्थानिक लोकांवर आणि त्यांच्या औद्योगिक प्रगतीवर मोठा परिणाम होईल.
कसे आहे या महामार्गाचे प्लानिंग?
या द्रुतगती महामार्गाच्या प्रकल्पासाठी 18020 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहेत. हा प्रकल्प ‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’ या पद्धतीने अंमलात आणला जाऊ शकतो. यावर सध्या एमएसआरडीसीकडून विस्तृत व्यवहार्यता अभ्यास सुरू आहे. पालघरमधील डडाणू, विक्रमगड,
जव्हार आणि मोखाडा तसेच नाशिकमधील त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यांमधून मार्ग जाणार असल्यामुळे या क्षेत्रांमधील औद्योगिक, सामाजिक आणि आर्थिंक विकासाला चालना मिळेल. या महामार्गामुळे स्थानिक नागरिकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी लागणारा वेळ कमी होईल. ज्यामुळे प्रवास अधिक सोयीस्कर होईल.
काय आहे एमएसआरडीसीचे नियोजन?
एमएसआरडीसीच्या नियोजनानुसार, तीन वर्षांत या प्रकल्पाचे काम पूर्ण होण्याचे अपेक्षित आहे. यासाठी 923.80 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. ज्यामध्ये पालघर आणि नाशिकमधील 42 गावांचा समावेश आहे. प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या संपादनाचे काम सुरू आहे.
एकदा हा महामार्ग पूर्ण होईल तर त्याच्या माध्यमातून नाशिक आणि पालघर जिल्ह्यांमधील उद्योगांना आणि व्यापाराला प्रोत्साहन मिळेल. तसेच या महामार्गामुळे मुंबई व नाशिक दरम्यानच्या वाहतुकीचे संकट कमी होईल आणि त्याचा फायदा स्थानिक विकासास होईल.
या प्रकल्पामुळे केवळ दोन जिल्ह्यांमध्ये वाहतूक सुधारणार तर त्या ठिकाणी औद्योगिक प्रगतीची नवी दिशा देखील दाखवली आहे. समृद्धी महामार्गाच्या यशानंतर या द्रुतगती महामार्गाचे काम लवकर पूर्ण होईल आणि महाराष्ट्रातील इतर महामार्गांच्या बांधणीला गती मिळेल.