पाणी मागणी अर्ज दाखल करण्यासाठी ५ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ !

Published on -

Maharashtra News : सर्वच लाभधारक शेतकरी मुदतीच्या आत सात नंबर पाणी मागणी अर्ज भरू शकले नाही. त्यामुळे पाटबंधारे विभागाने सात नंबर पाणी मागणी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ द्यावी,

अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाकडे केली होती. त्या मागणीची दखल घेवून सात नंबर पाणी मागणी अर्ज दाखल करण्यासाठी (दि.५) डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

त्यामुळे अजूनही ज्या लाभधारक शेतकऱ्यांनी सात नंबर पाणी मागणी अर्ज दाखल केलेले नाहीत. अशा सर्व लाभधारक शेतकऱ्यांनी आपले पाणी मागणी अर्ज तातडीने दाखल करावे, असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगाम सन २०२३-२४ साठी संरक्षित उभ्या भुसार, बारमाही, फळबागा तसेच सर्वच प्रकारच्या पिकांसाठी पाटबंधारे विभागाकडून दोन आवर्तन देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.

यामध्ये गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतीसाठी सात नंबर पाणी मागणी अर्जावर पाणी देण्यात येणार असून त्यासाठी लाभधारक शेतकऱ्यांना ३० नोव्हेंबर पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु काही अडचनीमुळे अनेक शेतकरी आपले पाणी मागणी अर्ज पाटबंधारे विभागाकडे दाखल करू शकले नाही.

चालू वर्षी झालेल्या अतिशय कमी पर्जन्यमानामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, बाजरी, मका, कापूस, तूर, आदी पिके शेतकऱ्यांच्या हातून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. दुष्काळाची परिस्थिती पाहता रब्बी हंगामात पिकांना पाण्याची कमतरता भासू नये व एकही लाभधारक शेतकरी आवर्तनापासून वंचित राहू नये,

यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सात नंबर पाणी मागणी अर्ज दाखल करणे गरजेचे आहे. परंतु अद्याप जे लाभधारक शेतकरी आपले पाणी मागणी अर्ज दाखल करू शकले नाहीत, त्या लाभधारक शेतकऱ्यांनी आपले पाणी मागणी अर्ज ५ डिसेंबर पर्यंत तातडीने दाखल करावे, असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News