Maharashtra News : राज्यात मराठा आरक्षण विधेयकाची अंमलबजावणी प्रक्रिया शासन स्तरावर सुरू असल्याने उमेदवारांना एसईबीसी प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्याने राज्य पोलीस दलाने पोलीस शिपाई भरती २०२३ साठी अर्ज करायला १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य पोलीस दलातील प्रशिक्षण व खास पथक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी मुदतवाढीबाबत एक पत्रक जारी करून ही माहिती दिली.
राज्य पोलीस मुख्यालयाने जारी केलेल्या पत्रकानुसार, पोलीस शिपाईपदांसाठी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, राज्य शासनाने नुकतेच मराठा आरक्षण विधेयक संमत केले असून, त्याची अंमलबजावणी प्रक्रिया शासन स्तरावर सुरू आहे.
त्याप्रमाणे उमेदवारांना एसईबीसी प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत आहे. त्यामुळे, पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आवेदन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १५ एप्रिलपर्यंत वाढविण्यात येत आहे.
पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी असलेल्या अंतिम तारखेपूर्वी काही उमेदवारांना तांत्रिक अडचणीमुळे प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्यास, अशा उमेदवारांनी पोलीस भरतीच्या अर्जासोबत प्रमाणपत्र मिळण्यासाठी केलेल्या अर्जाची पोचपावती सादर करावी.
मात्र, कागदपत्रे पडताळणीवेळी उमेदवारांकडे सर्व कागदपत्रे असणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.