अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2021 :-‘फेसबुकवरील मैत्री एकास चांगलीच महागात पडली आहे. मैत्रीचा फायदा घेत शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करण्याचे आमीष दाखवून एकास लाखो रुपयांचा गंडा घातल्याची घटना घडली आहे.
राहुलकुमार श्रीधर राऊत यांना राहुल नामदेव कवाडे याने फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. त्यानंतर ती रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करून दोघांची मैत्री झाली व बोलणे सुरू झाले. मैत्रीचा फायदा घेत कवाडे याने ‘मी ट्रेडिंग सुरू केले असुन कोणी गुंतवणूक करणार असेल तर सांगा.
१ लाखाला प्रतिदिवसाला मी ५ हजार देतोय आणि रक्कम जेंव्हा परत हवी असेल तर लगेच माघारी देखील देतोय’ असे सांगुन मोबाईलवर बँक अकाऊंटबाबतची माहिती पाठवली.’तुम्ही २ लाख ३० हजार गुंतवा, मी दररोज २० हजार तुम्हाला देत जाईल व जेंव्हा सर्व रक्कम लागेल तेंव्हा परत करेल मी कुणालाही फसवले नाही’ असे म्हणत फिर्यादीचा विश्वास संपादन केला.
‘शेअर मार्केटमध्ये नफा किंवा तोटा झाला तरी रोज २० हजार मिळतील.शेअर मार्केटचे अनेक कोर्स मी केलेले असून अनेक अधिकाऱ्यांनीही माझ्याकडे गुंतवणुक केलेली आहे’ यावर विश्वास ठेवत फिर्यादीने २ लाख ३० हजार रक्कम स्वतःच्या व आईच्या खात्यावरून आरोपीच्या एच.डी.एफ.सी बँक खात्यात ट्रान्सफर केली.
त्यानंतर कवडे याने मोबदला म्हणुन फिर्यादीच्या आईच्या खात्यावर तीन वेळा ५२ हजार रु. दिले. त्यानंतर मात्र पैसे देण्यास विलंब करून ‘मी शेअर मार्केटचा कोर्स करण्यासाठी पुण्याला जाणार आहे,वडिलांची तब्बेत खराब आहे’ अशी कारणे देत मोबदला दिला नाही.त्यानंतर फिर्यादीने गुंतवलेली २ लाख ३० हजार रक्कम परत मागितली असता ‘आज-उद्या देतो’ करत फिर्यादीचा मोबाईल नंबर ब्लॉक केला.
व त्यानंतर आरोपीने दीड लाख पाठवले.गुंतवणुकीचे ८० हजार आणि नफ्याचे येणे बाकी होते. फिर्यादी व फिर्यादीच्या पत्नीने हा सर्व प्रकार आरोपी कवडे याच्या पत्नीस फोन कॉलवर सांगितला. दि.१३ नोव्हे रोजी कवडे याने फिर्यादीच्या व्हाट्सअपवर चुकीच्या पद्धतीने मेसेज केले.
यापुर्वीही फिर्यादीने गुंतवणुकीचे पैसे मागितले असता ‘मी आत्महत्या करतो आणि सुसाईड नोटवर तुझे नाव लिहितो,पुन्हा मला व माझ्या बायकोला कॉल केला तर खोटा गुन्हा दाखल करून फसवतो ‘अशी धमकी दिली आहे. याप्रकरणी कर्जत पोलिसांनी आरोपी राहुल कवाडे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम