कागल : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात कागल तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढला.
कागल बसस्थानकापासून सुरू झालेल्या या मोर्च्याने संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधले. शेतकऱ्यांच्या संतप्त घोषणांनी तहसील कार्यालयाचा परिसर दणाणून गेला. तहसीलदार अमरदीप वाकडे यांना निवेदन देत हा महामार्ग त्वरित रद्द करावा, अशी ठाम मागणी करण्यात आली.

मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार संजय घाटगे, शिवाजी मगदूम, विजय देवणे, एम. पी. पाटील, शिवानंद माळी, सागर कोंडेकर, संभाजी भोकरे यांसारख्या शेतकरी नेत्यांनी केले. विशेष म्हणजे, महिलांचा यामध्ये लक्षणीय सहभाग होता.
माजी आमदार संजय घाटगे म्हणाले, “हा महामार्ग शेतकऱ्यांचे संपूर्ण जग उद्ध्वस्त करणार आहे. १२ जिल्ह्यांतील शेतकरी या प्रकल्पाला संघटितपणे विरोध करत आहेत. जमिनी हिसकावून शेतकरी भूमिहीन करण्याचा हा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही.
हा महामार्ग केवळ निसर्गाची हानी करणार नाही, तर सिंचन प्रकल्प, विहिरी, कूपनलिका आणि लहान उद्योग उद्ध्वस्त करेल. हा महामार्ग गोव्यालाच का न्यायचा, हे सरकार स्पष्ट का सांगत नाही?
शिवाजी मगदूम यांनी सरकारवर टीका करताना सांगितले, “आमच्या जमिनी आहेत म्हणून आम्हाला आमच्या मुली मिळाल्या. आता त्या हिसकावून सरकार आम्हाला भूमिहीन करणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आम्हाला मोर्चा काढण्यास भाग पाडले.
याचवेळी, अंबरिश घाटगे म्हणाले, “अंबाबाई आणि तुळजाभवानी मंदिरे आधी विकसित करा, रोजगार निर्मिती करा. महामार्गासाठी अनेक पर्यायी मार्ग आहेत, मग आमच्या जमिनींवरच डोळा का?”
व्हन्नूरच्या सरपंच पूजा मोरे यांनी सरकारच्या डावपेचांवर रोखठोक भाष्य केले. “आधी सांगितले होते की, हा महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातून जाणार नाही. आता मात्र पाचपट-दहापट मोबदल्याचे आमिष दाखवून आम्हाला फसवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही या मोहात पडणार नाही. सरकारसोबत वाटाघाटीच करायच्या नाहीत.”
शेवटी, उमा पाटील यांनी थेट इशारा देत सांगितले, “शेतकऱ्यांचे नुकसान करून कोण सधन होणार आहे, हे स्पष्ट आहे. पण आम्ही शेतकरी आहोत, राजकारणी नाही. हा महामार्ग जबरदस्तीने रेटण्याचा प्रयत्न झाला, तर आम्ही आत्मदहन करू.” मोर्चात उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी एकमुखी घोषणा देत सरकारला इशारा दिला की, शक्तिपीठ महामार्ग रद्द झाल्याशिवाय ते स्वस्थ बसणार नाहीत.