Maharashtra News : राज्यात अवकाळी, गारपिटीचा फटका बसलेल्या बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीनुसार तीन हेक्टरच्या मर्यादेत जिरायतीसाठी हेक्टरी १३,६०० रुपये,
बागायतींसाठी हेक्टरी २७ हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानभरपाईसाठी तब्बल ३६ हजार रुपये मदत करण्याचे निर्देश महसूल व विभागाने परिपत्रकाद्वारे जारी केले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन मदत देण्याचा निर्णय नोव्हेंबरमध्ये झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतला.
मात्र निर्णयाची अंमलबजावणी न केल्याने शेतकऱ्यांनी सरकारविरोधात रोष व्यक्त केला. अनेक भागांत शेतकरी रस्त्यावरही उतरले. राज्य सरकारने याची दखल घेत, बाधित शेतकऱ्यांना आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर जाऊन तीन हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्याचे
निर्देश महसूल व वन विभागाचे उपसचिव संजय धारूरकर यांनी परिपत्रकाद्वारे दिले आहेत. एनडीआरएफच्या निकषानुसार यापूर्वी २ हेक्टरच्या मर्यादेत मदत दिली जात होती. आता नव्या निर्णयाप्रमाणे मदत देण्यात येणार आहे.