Maharashtra News : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी बळीराजाचा अवमान करून धार्मिक भावना दुखविल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनामध्ये म्हटले आहे की, रुपाली चाकणकर यांनी १४ नोव्हेंबर रोजी त्यांच्या स्वतःच्या अधिकृत फेसबुकवरून बहुजनांचा राजा बळीराजाच्या मस्तकावर वामनाने पाय दिल्याचा काल्पनिक फोटो पोस्ट केला होता.
मुळात राज्यातील शेतकरी वर्ग महासम्राट बळीराजाला आपली अस्मिता मानतो. दिवाळी बलिप्रतिपदेच्या दिवशी शेतात बळीपूजन करतो. इतिहासात बळीराजाला वामन, या आक्रमकाने कपटाने ठार मारले. हा प्रसंग महात्मा ज्योतिबा फुल्यांनी आपल्या गुलामगिरी या ग्रंथात सिद्ध केला.
बळीराजाला इथला बहुजन पुर्वज मानतो, त्याच्या डोईवर आक्रमक वामनाने पाय ठेऊन पाताळात घालणारे काल्पनिक चित्र प्रसारीत करणे म्हणजे आपल्या पूर्वजांचा वारसा नाकारून वामनाचे उदात्तीकरण करणे होय.
त्यामुळे मराठा, बहुजन व शेतकरी वर्गाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत, त्यामुळे चाकणकर यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या पोस्टबाबत काही प्रश्न उपस्थित झाल्यानंतर पोलीस प्रशासनावर दबाव टाकून प्रश्न विचारणाऱ्यांवरच कारवाई करण्याचा प्रकार घडला आहे.
संवैधानिक पदावर असताना चाकणकर यांनी महापुरूष बळीराजाचा वारसा नाकारत वामनाचे उदात्तीकरण केले. त्याचप्रमाणे प्रशासनाला खोटी माहिती देत सामाजिक संघटनेची व पदाधिकाऱ्याची नाहक बदनामी केली आहे.
संवैधानिक पदाचा दुरुयोग करणाऱ्या चाकणकरांना पदमुक्त करण्यात यावे. याबाबतचे निवेदन कर्जतचे तहसीलदार गणेश जगदाळे यांना देण्यात आले आहे. यावेळी ‘इडा पिडा टळो, बळीचं राज्य येवो’ अशा घोषणा देण्यात आल्या.