मुंबई- लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग आणि भाजपवर मतचोरीचा गंभीर आरोप केल्यानंतर आता काँग्रेसच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा लोकसभा निवडणुकीनंतरचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे.
माझ्या नागपूर लोकसभा मतदारसंघातील जे माझे जवळचे, नातेवाईक मतदार होते, अशा साडेतीन लाख लोकांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली होती, अशी खंत नितीन गडकरींनी एका टीव्ही मुलाखतीत व्यक्त केली होती. तोच व्हिडीओ आता काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर व आव्हाड यांनी ट्विट करून सत्ताधाऱ्यांसह निवडणूक आयोगाला आरसा दाखवला आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

केंद्रीय मंत्री गडकरी यांनी ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर दिलेल्या मुलाखतीत आपल्या नागपूर लोकसभा साडेतीन लाख मतदारांची नावे वगळण्यात गेली होती, अशी व्यथा व्यक्त केली होती. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकताच कर्नाटक, महाराष्ट्रासह इतर राज्यांत मतदार याद्यांत बोगस मतदार नोंदवून निवडणुकीत हेरीफेरी केल्याचा आरोप केला होता.
या आरोपानंतर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी नितीन गडकरींचा नोव्हेंबर २०२४ मधील एका मुलाखतीतील भाग एक्सवर पोस्ट केला आहे. ‘ये अंदर की बात है, नितीन गडकरी ‘सत्य’ के साथ है!’ असा हॅशटॅग देत ठाकूर यांनी म्हटले आहे की, राहुल गांधी यांना खोटे ठरवू पाहणाऱ्या भाजपच्या अंधभक्तांनी हा व्हिडीओ पहावा.
आता तर भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच तुम्हाला उघडे पाडले आहे. त्यांच्या स्वतःच्या नागपूर मतदारसंघात साडेतीन लाख मतदार मतदारयादीतून वगळले गेल्याचे गडकरी सांगत आहेत. भाजपवाल्यांनो ‘उघडा डोळे, ऐका नीट’ अशी पोस्ट ठाकूर मतदारसंघातील यांनी केली आहे.
दुसरीकडे, ठाकूर यांच्या नंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी गडकरींचा तोच व्हिडीओ ट्विट करून भाजपसह निवडणूक आयोगावर टीकास्त्र सोडले आहे. नितीन गडकरी यांनी ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांना दिलेल्या मुलाखतीत आपली साडेतीन लाख मते कापली गेली होती, अशी व्यथा व्यक्त करून दाखवली.
पण, त्याहून आणखी एक सत्य असे आहे की, नितीन गडकरी यांना लोकसभेची उमेदवारी देण्यातच अडचण निर्माण करण्यात आली होती. माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अतिशय आग्रही भूमिका घेतल्यानेच गडकरी यांना उमेदवारी मिळाली. गडकरी यांना पाडायचा असा जवळ जवळ निर्णयच झाला होता!’ अशी टिप्पणी आव्हाड यांनी एक्सवर केली आहे.
काँग्रेसचे विधिमंडळातील गटनेते विजय वडेट्टीवार यांनीही नितीन गडकरींच्या मुलाखतीवरून सत्ताधारी आणि निवडणूक आयोगाला डिवचले आहे. मतचोरी होते, मतदारयादीत घोळ केले जातात, याचा पुरावा आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला. त्यांच्या मतदारसंघातील साडेतीन लाख मतदारांची नावे वगळण्यात आली, त्यात त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक आणि भाच्याच्या नावाचा समावेश होता.
गडकरी यांच्या जवळच्या लोकांची नावे जर मतदारयादीतून गायब होत असतील, तर इतरांचे काय? कुठे मतदार वाढवून दाखवले जात आहे, तर कुठे मतदार गायब केले जात आहेत, मतचोरीचा याहून आणखी मोठा पुरावा काय हवा? निवडणूक आयोगाची वकिली करणारे मुख्यमंत्री, भाजप नेते गडकरींना जाब विचारणार का? का गडकरींची कोणती चीप आणि डिस्क खराब झाली आहे? गडकरी यांच्याकडे निवडणूक आयोग आता प्रतिज्ञापत्रक मागणार का? अजून पुरावे मागणार की माफी मागणार? असा सवाल वडेट्टीवार यांनी विचारला आहे.