सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी हे नाव आता अगदी सर्वसामान्य नागरिकांनाही माहिती झालेले आहे. ईडीने आजवर अनेक कारवाया महाराष्ट्रात केलेल्या आहेत. यामध्ये अनेक नेत्यांना अटकही झाली आहे.
अनेकांवर आजही अटकेची टांगती तलवार आहे. आता ईडीने जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय असणाऱ्या नेत्यावर कारवाई केली आहे. जिल्हा परिषदेच्या सदस्यावर थेट कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.
पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. मंगलदास बांदल यांच्या निवासस्थानावर मंगळवारी दुसऱ्यांदा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कारवाई केली.
शिक्रापूर आणि हडपसरच्या निवासस्थानावर ही धाड टाकण्यात आली. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. येथे करोडोंचे घबाड सापडल्याच्या चर्चा आहेत.
पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या फसवणूक प्रकरणी बांदल यांना २६ मे २०२१ रोजी शिक्रापूर पोलिसांनी अटक केली होती. या नंतर त्यांच्याविरोधात अनेक तक्रारी दाखल झाल्या. लोकसभा निवडणुकीपूर्वी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता.
शिरूर हवेलीच्या राजकारणातील महत्वाचा चेहरा म्हणून बांदल यांची ओळख आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ते निकटवर्तीय मानले जातात.
यापूर्वीही बांदल यांच्यावर ईडीने कारवाई केली होती. मंगळवारी सकाळी बांदल यांच्या शिक्रापूर आणि महमंदवाडी (ता. हवेली) येथील निवासस्थानावर ईडीने धाड टाकली. चार वर्षांत ईडीची ही दुसरी कारवाई आहे.
बांदल यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या रेखा बांदल तसेच भाऊ हे शिक्रापूर येथील निवासस्थानी आहेत तर महमंदवाडी येथील निवासस्थानी मंगलदास बांदल आणि पुतणे आहेत.
रात्री उशिरापर्यंत बांदल कुटुंबीयांकडे चौकशी सुरू होती. ईडीच्या या छापेमारीमुळे बांदल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.