चार महामार्ग जाणार नंदुरबारातून; दोन महामार्गांची कामे सुरू, एक चौपदरीकरण, तीन उड्डाणपूलही आहेत मंजूर

Published on -

१५ मार्च २०२५ नंदुरबार : जिल्हा मुख्यालयाचे शहर आणि गुजरात व मध्य प्रदेश राज्यांच्या सीमेवर असलेले नंदुरबार आता महामार्गाचे हब ठरू पाहत आहे. शहराला जोडणाऱ्या चारही भागांतील रस्ते हे महामार्ग म्हणून जोडले जात आहेत. यामुळे दळणवळणाला गती येईल व शहर विकासालाही चालना मिळणार आहे.

नंदुरबारमधून जाणाऱ्या उधना-जळगाव रेल्वे मार्गाचेही चौपदरीकरण प्रस्तावित असल्याने नंदुरबारचे महत्त्व वाढणार आहे. शेवाळी-नेत्रंग (७५३बी) हा चौपदरी महामार्ग, विसरवाडी-सेंधवा, (७५२जी) सोनगीर नंदुरबार आणि (सोलापूर – अहमदाबाद) धरणगाव-धानोरा राज्यमार्ग या महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. सर्वच महामार्ग हे सिमेंट काँक्रीटचे होणार आहेत. क वर्ग नगरपालिका त्यावेळी असल्याने विकासनिधीही पुरेसा मिळत नव्हता. जिल्हा निर्मितीनंतर जिल्हा मुख्यालयाचे शहर होताच विकास होऊ लागला. खान्देशातील विकसित शहरांत नंदुरबारचा उल्लेख केला जातो.

जमिनीचे अधिग्रहण पूर्ण

नंदुरबार ते तळोदा या मार्गाच्या चौपदरीकरणासाठी जमीन अधिग्रहणाचे काम पुर्ण झाले आहे. नंदुरबार शहरासह तालुक्यातील जमिन आणि तळोदा तालुक्यातील जमिन अधिग्रहीत केली गेली आहे. मधला टप्पा हा गुजरात राज्यातील येतो. तापीवरील हातोडा पूल देखील दोन्ही राज्यात येतो. त्यामुळे त्यालाही चालना मिळणे आवश्यक आहे. ते काम झाल्यास दोन वर्षात चौपदरीकरण पूर्ण होऊ शकते.

निधी वेळवर उपलब्ध व्हावा

मंजूर कामांना निधी वेळेवर उपलब्ध व्हावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. कोळदा-खेतिया मार्ग अनेक वर्षापासून रेंगाळला होता. विसरवाडी-कोळदा हा पहिला टप्पा अद्याप सुरू होऊ शकला नाही.

शेवाळी-नेत्रंग व विसरवाडी-सेंधवा महामार्ग

मुंबई-आग्रा महामार्गापासून निघालेला सोनगीर-दोंडाईचा-नंदुरबार हा नवीन महामार्ग मंजूर झाला आहे.त्याचे काम देखील सुरू करण्यात आले आहे. दोंडाईचा ते नंदुरबार दरम्यान तीन टप्प्यात हे काम मंजूर असून, दोन टप्प्यांमधील कामाला सुरुवात झाली आहे.

पूर्वी या महामार्गाचे चौपदरीकरण मंजूर होते.वाहतुकीचा भार कमी आणि खासगी जागा अधिग्रहित करणे या दोन बाबींमुळे चौपदरीकरणाऐवजी १८ मीटर रुंदीचा काँक्रीटीकरणाचा हा महामार्ग राहणार आहे.

दोन वर्षांत त्याचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. यात दोन मोठे व १० पेक्षा अधिक लहान पूल होणार आहेत. मार्गातील सर्व गावांना सेवा रस्ता राहणार आहे.
शेवाळी-नेत्रंग महामार्गाचे पहिल्या टप्पाचे अर्थात शेवाळी फाटा ते नंदुरबार पर्यंतचे काम ७० टक्के पर्यंत झाले आहे. नंदुरबार ते तळोदा पर्यंत हा महामार्ग चौपदरी होणार आहे.

या दरम्यान काही भाग हा गुजरात राज्यातून जाणार असल्याने तेथे भूसंपादनाची प्रक्रिया अडकली असल्याने विलंब होत आहे. शहरातूनच महामार्ग जाणार असल्याने वळण रस्त्यावरच चौपदरीकरण केले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe