चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा ; पोलीस शहीद

Mahesh Waghmare
Published:

६ जानेवारी २०२५ दंतेवाडा : छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त बस्तर भागातील चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले.या धूमश्चक्रीत जिल्हा राखीव दलाचा एक पोलीस जवानही शहीद झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी रविवारी दिली.

दक्षिण अबुझमाडच्या जंगलात सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाकडून शुक्रवारपासून नक्षलविरोधी अभियान राबविले जात आहे.शनिवारी सायंकाळी नारायणपूर व दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमेजवळील जंगलात या पथकावर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला.

त्याला सुरक्षा दलानेही प्रत्युत्तर दिले.त्यानंतर बराच वेळ थांबून थांबून चकमकी सुरू राहिल्या.गोळीबार थांबल्यानंतर शोध मोहिमेत सुरक्षा दलाला नक्षलवाद्यांचे ४ मृतदेह आढळून आले.घटनास्थळाहून एक एके-४७ रायफल व एक सेल्फ लोडिंग रायफलसह इतर स्वयंचलित शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

या चकमकीत जिल्हा राखीव दलाचे हेड कॉन्स्टेबल सन्नू करम शहीद झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी रविवारी दिली.अजूनही या भागात शोध अभियान सरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उल्लेखनीय बाब म्हणजे, राज्यभरातील नक्षलवाद विरोधी अभियानादरम्यान उडालेल्या विविध चकमकीत सुरक्षा दलाने गतवर्षी एकूण २१९ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले.यापूर्वी २२ नोव्हेंबर रोजी छत्तीसगडच्या सुकमा जिल्हयातील चकमकीत सुरक्षा दलाने १० नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता.त्यावेळी मोठा शस्त्रसाठा व दारुगोळा जप्त करण्यात आला होता.

नक्षलविरोधी लढा सुरूच राहील – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनीही एक्स या सोशल मीडियावरून चकमकीबद्दल माहिती दिली.चकमकीत शहीद झालेल्या पोलीस जवानाबद्दलही त्यांनी तीव्र संवेदना व्यक्त केली. त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही.सुरक्षा दल नक्षलवादाविरोधात अत्यंत खंबीरपणे लढत आहे.आपल्या जवानांना आम्ही सलाम करतो. नक्षली समस्या संपुष्टात येत नाही, तोपर्यंत लढा सुरूच राहील,असे ते म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe