१२ फेब्रुवारी २०२५ पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभार्थी असलेल्या महिलांची निकषानुसार छाननी सुरू झाली आहे. त्यामध्ये पहिल्या टप्यात चारचाकी असलेल्या बहिणींच्या नावांची पडताळणी प्रशासकीय पातळीवर सुरू झाली आहे. यामध्ये अपात्र आढळणाऱ्या बहिणींची नावे तत्काळ वगळण्यासही सुरुवात झाली असून, पुण्यात चारचाकी असलेल्या बहिणींची संख्या सुमारे ७५ हजार १०० एवढी आहे.
राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही महत्त्वाकांक्षी योजना जाहीर करून महिलांना दीड हजार रुपयांचा लाभ देण्यात आला.यामध्ये पुणे जिल्ह्यातील जवळपास वीस लाख लाभार्थी महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले.आता लाभार्थी महिला किंवा तिच्या कुटुंबीयांच्या नावावर चारचाकी असल्यास त्यांचा लाभ बंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/ईव्हीएम-मशिनची-पडताळणी-होईल-2025-02-12T094742.305.jpg)
यासाठी अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जात आहे. मात्र, थेट घरोघरी जाऊन पडताळणी करण्याचे प्रशासनाकडून टाळले आहे. कारण, ज्या नावांची यादी प्रशासनाला राज्याकडून प्राप्त झाली आहे, त्या लाभार्थ्यांच्या नावे चारचाकी वाहन असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.त्यामध्ये केवळ अंगणवाडी सेविकांकडून त्यांच्या कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांची नावे कळवून खातरजमा करून घेतली जात आहे.
त्यामुळे आता हे जवळपास निश्चित झाले आहे की किमान शासनाकडून जिल्हा प्रशासनाला आलेली यादीमधील नावे अपात्र करण्याची प्रक्रिया प्रशासनाच्या पातळीवर सुरू केली आहे. तर, काही महिलांकडून महिला व बालकल्याण विभागाकडे स्वतःहून लाभ सोडत असल्याचे अर्ज केले जात आहेत.
राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाच्या सचिवांनी प्रत्येक जिल्ह्याला योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने तयारी करून याद्यांची तालुकानिहाय वर्गवारी करून पडताळणी सुरू करण्यात आली.