अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :- जळगावातील अॅड. विजय पाटील यांच्या फिर्यादीवरून दाखल गुन्ह्यात भाजप नेते गिरीश महाजन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आज सकाळीच पुणे पोलिसांच्या पथकाने जळगावात पाच ते सहा ठिकाणी छापेमारी केली आहे.
त्यानंतर या प्रकरणातील मूळ फिर्यादी विजय पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. गिरीश महाजन हे या प्रकरणातील मूळ सूत्रधार असून त्यांच्यावर मोक्काची कारवाई होईलच, असा आपल्याला विश्वास असल्याची प्रतिक्रिया विजय पाटील यांनी दिली आहे.
गिरीश महाजन यांना मराठा विद्या प्रसारक संस्था हडप करायची होती मात्र त्यांना तसं न करता आल्याने त्यांनी आपल्याला त्रास दिल्याचेही विजय पाटील यांनी सांगितले. पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल गंभीर गुन्ह्याच्या तपासासाठी पुणे पोलिसांचे पथक जळगावात दाखल झाले आहे.
पुणे पोलिसांच्या पथकात सुमारे 60 ते 70 पोलिसांचा समावेश असल्याची माहिती आहे. जळगावात एकाच वेळी 5 ठिकाणी पुणे पोलिसांची छापेमारी असल्याचं कळतंय.
जळगावातील अॅड. विजय पाटील यांनी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने पुणे पोलिसांनी छापेमारी केल्याची चर्चा सुरु आहे.
दरम्यान ‘भाजपचे आमदार गिरीश महाजन यांच्यावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याने त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
मोक्का कारवाईच्या भीतीनेच तर गिरीश महाजन यांना करोनाची लागण झाली नाही ना?’ असा टोला एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांना लगावला आहे.
राज्यातील अनेक नेत्यांना अलिकडील काळात करोनाचा संसर्ग झाला आहे. आमदार गिरीश महाजन यांनाही करोनाची लागण झाल्याची माहिती शनिवारी समोर आली.
यावरून आता त्यांचे कट्टर राजकीय विरोधक एकनाथ खडसे यांनी शंका उपस्थित केली आहे. मोक्का लावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, या भीतीने तर महाजनांना करोना झाला नाही ना? असा सवाल खडसेंनी उपस्थित केला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम