Maharashtra Politics : राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात उतरले असल्याने आधीच घोडेबाजाराची चर्चा सुरू झाली आहे. अशात आणखी एका उमेदवाराने अपक्ष निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे. मते मिळावीत यासाठी त्यांनी आमदारांना जाहीरपणे ऑफरही दिली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आधीच यामुळे ते चर्चेत आले आहेत. अर्थात त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आवश्यक असलेले अनुमोदन तरी मिळणार का? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. उस्मानाबाद येथील राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे अध्यक्ष अरुण निटूरे यांनी राज्यसभा निवडणूक लढवायचे ठरवले आहे.

ते अर्जही दाखल करणार आहेत. राज्यसभा निवडणुकीत आमदारांनी सहकार्य केल्यास त्यांना प्रत्येकी एक टाटा सफारी गाडी भेट म्हणून देऊ. हे कोणतेही आमिष नसून मतदारसंघात त्यांना काम करता यावं यासाठी भेट असणार आहे, अशी घोषणाच त्यांनी केली आहे.
एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून शेतकरी आमदारांनी मला मतदान करावं आण संसदेत पाठवावं. त्यांचे उपकार मी विसरणार नाही, असं आवाहन त्यांनी केलं आहे. राज्यसभा निवडणुकीत जिंकण्यासाठी ४२ मतांची गरज आहे. या ४२ आमदारांना सफारी गाडी देण्यासाठी किती खर्च येईल, याचा हिशेबही निटुरे यांनी केला आहे.
त्यांनी ४५ सफारी गाड्यांचे कोटेशनही घेतले आहे. टाटा सफारी गाडीची किंमत साधारण २६ लाख इतकी आहे. त्याप्रमाणे आपल्याला मतं देणाऱ्या सर्व आमदारांना गाडी द्यायची झाली तर त्यांना सुमारे ११ कोटी ८१ लाख रुपये मोजावे लागतील.