Navi Mumbai Metro News : मुंबई, नवी मुंबई, पुणे, नागपूर या शहरांमध्ये मेट्रो सुरू झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे या शहरांमध्ये मेट्रोचा विस्तारही झपाट्याने केला जात आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणखी सक्षम व्हावी यासाठी मेट्रोचे जाळे विणले जात आहे.
दरम्यान नवी मुंबईकरांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. गणेशोत्सवाच्या आधीच नवी मुंबईमधील मेट्रो ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक गुड न्यूज हाती आली आहे. ती म्हणजे बेलापूर-पेंढार मेट्रो मार्गावरील प्रवास येत्या काही दिवसांनी स्वस्त होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सात सप्टेंबर पासून नवी मुंबई मेट्रोच्या तिकीट दरात कपात होणार आहे. नवी मुंबई मेट्रोचे तिकीट दर तब्बल 33 टक्क्यांनी कमी होणार असून यामुळे या मेट्रोने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे.
सिडकोच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने काल गुरुवारी यासंदर्भात माहिती दिली आहे. सदर अधिकाऱ्यानुसार 7 सप्टेंबर 2024 पासून नवी मुंबई मेट्रोच्या तिकीट दरात 33 टक्क्यांची कपात होणार आहे. सध्या नवी मुंबई मेट्रो ने प्रवास करण्यासाठी कमाल चाळीस रुपये एवढे भाडे आकारले जात आहे.
मात्र नवीन दरानुसार हे भाडे कमाल 30 रुपये एवढे राहणार आहे. सुधारित दरानुसार किमान भाडे दहा रुपये आणि कमाल भाडे 30 रुपये असेल. महत्त्वाचे म्हणजे याबाबतचे एक प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आले आहे.
या प्रसिद्धी पत्रकात दिलेल्या माहितीनुसार नवी मुंबई मेट्रो ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 0-2 किमी आणि 2-4 किमीच्या पहिल्या भागासाठी 10 रुपये, 4-6 किमी आणि 6-8 किमीसाठी 20 रुपये आणि 8-10 किमी आणि त्यापुढील तिकिटांची किंमत 30 रुपये एवढे भाडे द्यावे लागणार आहे.
सध्या, बेलापूर टर्मिनल ते पेंढारपर्यंतचे मेट्रोचे भाडे 40 रुपये आहे, पण हे भाडे लवकरच 30 रुपये करण्यात येणार आहे. नक्कीच गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर सिडकोचा हा निर्णय नवी मुंबईकरांसाठी मोठा फायद्याचा ठरणार आहे.
यामुळे नवी मुंबई मेट्रो ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सुद्धा वाढणार आहे. खरे तर नवी मुंबई मेट्रो 17 नोव्हेंबर 2023 पासून सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. या मार्गावर सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत मेट्रो चालवली जाते.
या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी प्रत्येक पंधरा मिनिटांनी मेट्रो उपलब्ध आहे. जेव्हापासून नवी मुंबईमध्ये मेट्रो सुरू झाली आहे तेव्हापासून या भागातील नागरिकांचा प्रवास हा सुपरफास्ट झाला असून अनेकांनी या मेट्रो सेवेला चांगला प्रतिसाद दाखवला आहे.